Israel Palestine :  इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील (Israel Palestine Conflict) कट्टरतावादी संघटना हमास (Hamas) यांच्यात मागील तीन दिवसांपासून घनघोर युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूने रॉकेट हल्ले, हवाई हल्ले सुरू आहेत. एका बाजूला हे चित्र असताना दुसरीकडे इस्त्रायलमध्ये अरबी-मुस्लिमांची (Arab Muslim) लोकसंख्या चांगल्या प्रमाणात आहे.  मागील काही वर्षात सीमालगतच्या भागात अरबी-मुस्लिमांची संख्या वाढली आहे. 


आकडेवारी काय सांगते?


सेंट्रल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स (CBS) नुसार, 2021 मध्ये संपूर्ण इस्रायलची लोकसंख्या सुमारे 9.5 दशलक्ष इतकी होती. यामध्ये वेस्ट बँक आणि गाझा येथे राहणाऱ्या लोकांचाही समावेश आहे. यापैकी 6 दशलक्षाहून अधिक ज्यू, तर 2 दशलक्षाहून अधिक मुस्लिम आहेत. या आकडेवारीत मात्र, एक वेगळा पॅटर्न दिसतो. उदाहरणार्थ, पॅलेस्टिनी ब्युरो ऑफ स्टॅटिक्सनुसार 3 दशलक्ष पॅलेस्टिनी वेस्ट बँकमध्ये राहतात. तर 2 दशलक्ष नागरीक गाझामध्ये राहतात. ही आकडेवारी योग्य असल्याची गृहीत धरल्यास 9 दशलक्ष ज्यू असलेल्या इस्रायलमध्ये आणि त्याच्या बाजूच्या पॅलेस्टाईन पट्ट्यात मुस्लिम लोकसंख्या सुमारे 5 दशलक्ष होते. 


हाइफा विद्यापीठाच्या डेटानुसार, इस्रायलमध्ये 7.45 दशलक्ष नागरीक ज्यू धर्मीय आहेत. त्यापैकी 7.53 अरब इस्रायली आहेत. हे नागरीक इस्रायल मुख्य भूमीशिवाय वेस्ट बँक आणि गाझा पट्टीमध्ये वास्तव्य करत आहेत. 


ज्यूंमधील मृत्यू दर अधिक


ज्यू धर्मीयांमध्ये मृत्यू दराचे प्रमाण अधिक आहे. 'टेलर अॅण्ड फ्रान्सिस' या रिसर्च जर्नलने एक संशोधन प्रसिद्ध केले होते. वॉच आउट फॉर चिल्ड्रन या नावाने प्रकाशित झालेल्या संशोधनात असे मानले गेले की, 19व्या शतकात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला ज्यूंमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक होते. सेंट्रल युरोपियन युनिव्हर्सिटीनेही मान्य केले होते की जगातील सर्व समुदायांमध्ये ज्यू समुदायामध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. पण नाझी काळात झालेला नरसंहार आणि त्यानंतर झालेली भटकंती वगळता संशोधनातून त्याची कारणे फारशी समोर येत नाहीत.


त्या तुलनेत मुस्लिम समाज अधिक प्रजननक्षम आहे आणि मृत्यूचे प्रमाणही कमी आहे. त्याचा परिणाम इस्रायलमधील ज्यूंच्या लोकसंख्येवर होताना दिसत आहे.  इस्रायलमध्ये ज्यूंची संख्या कमी होताना दिसत आहे, तर मुस्लिम धर्मीयांची लोकसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. 


धर्मांतराचा होतोय परिणाम?


इस्त्रायली ज्यू स्वतः मुस्लिम धर्म स्वीकारत असल्याचा दावाही अनेक इस्लामिक संघटना करतात. त्यांच्या मते, 2003 मध्ये अनेक लोकांनी इस्लामचा स्वीकार केला आणि उघडपणे ही बाब मान्य केली.  तेव्हापासून ही संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, मुस्लिम संघटना वगळता या दाव्याला पाठबळ देणारी इतर माहिती, सर्वेक्षण आकडेवारी उपलब्ध नाही. 


ज्यूंच्या लोकसंख्येत घट


CBS ने 2021 मध्ये पहिल्यांदाच ज्यूंची लोकसंख्या झपाट्याने कमी झाली असल्याचे मान्य केले आहे. इस्त्रालयच्या स्थापनेच्या वेळी 1948 मध्ये, सुमारे 82.1 टक्के इस्रायली ज्यू होते. मागील सात दशकांच्या काळात ही ज्यूंच्या लोकसंख्येत जवळपास 10 ते 15 टक्क्यांची घसरण झाली आहे. 


अरबांचेही इस्त्रायलमध्ये वास्तव्य


ज्यूनंतर या देशात इस्रायली अरब नागरिकांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यापैकी बहुतांश सुन्नी मुस्लिम आहेत. ते स्वतःसाठी 'पॅलेस्टिनी इनसाइड' ही संज्ञा वापरतात. याचा अर्थ इस्त्रायलमधील पॅलेस्टिनी नागरीक. या नागरिकांना इस्रायलमध्ये समान अधिकार आहेत, परंतु विवाह आणि वारसा यासारख्या वैयक्तिक बाबींमध्ये वेगळे कायदे लागू होतात.