लखनऊ : दहशतवादी संघटना आयसिसने ताजमहल उडवण्याची धमकी दिली आहे. एका मायक्रो ब्लॉगिंग साईटवर आयसिसने ताजमहलसह भारतात अनेक ठिकाणी हल्ले करण्याची धमकी दिली. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांकडून ताजमहलच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.


उत्तर प्रदेश पोलिसांनी आग्र्यात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. कोणत्याही प्रकारच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं अतिरिक्त पोलीस महासंचालक दलजीत चौधरी यांनी सांगितलं.

इंटरनेटवर लिंक तयार करुन ती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ती आयसिसची धमकी असल्याचं सांगितलं जात आहे. तरीही पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून ताजमहलसह आजू बाजूच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे, असं दलजीत चौधरी यांनी सांगितलं.

'ताज महोत्सव' या वार्षिक कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदर ही धमकी देण्यात आली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आयसिसने एक फोटो प्रसिद्ध करुन ताज महल आपला पुढील निशाणा असल्याची धमकी दिली आहे.



दरम्यान हा फोटो लखनऊत आयसिसचा दहशतवादी सैफुल्लाह आणि एटीएसमध्ये झालेल्या चकमकीनंतर जारी करण्यात आला आहे. फोटोमध्ये ताजमहल समोर 'न्यू टार्गेट', असं लिहिलं आहे. त्यामुळे पोलिसांनी या धमकीची गांभीर्याने दखल घेतली आहे.