इंफाळः मणिपूरची 'आयर्न लेडी' इरोम शर्मिला आज तब्बल 16 वर्षांनी उपोषण सोडणार आहे. स्थानिक न्यायालयात आज सकाळी साडे 10 वाजता शर्मिला उपोषण सोडणार आहेत. शर्मिला यांनी मागील महिन्यात उपोषण सोडण्याची घोषणा केली होती.


 

 

मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी शस्त्र दल विशेष शक्ती कायदा रद्द करण्यासाठी 2000 साली उपोषण सुरु केलं. मात्र सरकारने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी तब्बल 16 वर्ष उपोषण सुरु ठेवलं.

 

कोण आहेत इरोम शर्मिला?

 

शर्मिला यांना आयर्न लेडी म्हणून ओळखलं जातं. शस्त्र दल विशेष शक्ती कायदा रद्द करण्यासाठी गेल्या 16 वर्षांपासून त्यांचं उपोषण सुरु आहे. या काळात त्यांना अनेकदा अटक करण्यात आली. शिवाय त्यांना जबरदस्ती अन्न देण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

 

 

शर्मिला यांनी 2014 साली दिल्लीतील जंतर मंतरवर आमरण उपोषणाची घोषणा केली. मात्र त्यांच्यावर आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या 16 वर्षांपासून आपण ज्या गोष्टीसाठी लढत आहोत, त्यासाठी लोकांचा पाठिंबा कमी झाला असल्याची खंत शर्मिला यांना आहे.

 

 

उपोषण सोडल्यानंतर शर्मिला राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याचं सांगितलं जात आहे. मणिपूरमधील राजकीय वर्तुळात यामुळे जोरदार खळबळ माजली आहे. दरम्यान उपोषणानंतर शर्मिला यांची पुढील दिशा काय असेल, याविषयी कसलीही माहिती नाही, असं शर्मिला यांच्या भावाने सांगितलं.