तब्बल 16 वर्षांनी उपोषण संपवण्याची घोषणा, आता निवडणूक लढवणार
एबीपी माझा वेब टीम | 26 Jul 2016 12:02 PM (IST)
नवी दिल्लीः मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांचं शस्त्र दल विशेष शक्ती कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेलं उपोषण तब्बल 16 वर्षांनी संपलं आहे. मणिपूरच्या शर्मिला यांनी 16 वर्षांपूर्वी शस्त्र दल विशेष शक्ती कायदा रद्द करण्यासाठी उपोषण सुरु केलं होतं. आता उपोषण संपवण्याचं जाहीर केलं आहे. इरोम शर्मिला यांनी 9 ऑगस्टला उपोषण सोडण्याची घोषणा केली आहे. त्यासोबतच शर्मिला यांनी मणिपूर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचीही घोषणा केली आहे. कोण आहेत इरोम शर्मिला? शर्मिला यांना आयर्न लेडी म्हणून ओळखलं जातं. गेल्या 16 वर्षांपासून त्यांचं शस्त्र दल विशेष शक्ती कायदा रद्द करण्यासाठी उपोषण सुरु आहे. या काळात त्यांना अनेकदा अटक करण्यात आली. शिवाय त्यांना अनेकदा जबरदस्ती अन्नही देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शर्मिला यांनी 2014 साली दिल्लीतील जंतर मंतरवर आमरण उपोषणाची घोषणा केली. मात्र त्यांच्यावर आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या 16 वर्षांपासून आपण ज्या गोष्टीसाठी लढत आहोत, त्यासाठी लोकांचा पाठिंबा कमी झाला असल्याची खंत शर्मिला यांना आहे.