IRCTC Service Down : आयआरसीटीसीच्या (IRCTC) अॅप आणि वेबसाईटवरुन रेल्वे तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. आयआरसीटीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने देशभरातील रेल्वे तिकीट आरक्षण यंत्रणा कोलमडली आहे. आज मंगळवारी (25 जुलै) पहाटे 3.30 वाजल्यापासून हा बिघाड सुरु झाला आहे. याचा परिणाम मुंबईत देखील दिसून येत आहे, लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यूटीएस अॅपमधून (UTS App) तिकीट काढता येत नाही तसेच ATVM मशीन द्वारे देखील तिकीट बुकिंग होत नाही.


यंत्रणेच्या फायरवॉलमध्ये तंत्रिक बिघाड झाल्याने आरक्षण यंत्रणा बंद झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे आयआरसीटीसी कॉर्पोरेट कार्यालयाचे म्हणणे आहे. 
प्रवासी सुविधेकरता ऑफलाईन आरक्षणसाठी अतिरिक्त तिकीट खिडकी सुरु करण्यात आल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाईन यंत्रणा सुरु झाली नसल्याने मेल-एक्स्प्रेस तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी वाढू लागली आहे.


दरम्यान IRCTC ने आपल्या ट्विटर हँडलवर या तांत्रिक अडचणीची माहिती दिली आहे. IRCTC ने ट्वीट लिहिलं आहे की, 'तांत्रिक कारणांमुळे तिकीट बुकिंग सेवा उपलब्ध नाही. आमची तांत्रिक टीम ही समस्या दूर करण्यासाठी काम करत आहे. ही अडचण दूर होताच, आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती देऊ."






तुम्ही इतर पर्याय वापरुन पाहू शकता, तथापि, या काळात तिकीट बुक करायचे असल्यास, तुम्ही इतर अॅप्स वापर शकता. खुद्द IRCTC ने याबाबत माहिती दिली आहे. आयआरसीटीने आपल्या ट्वीटमध्येच सांगितलं आहे की, "तांत्रिक कारणांमुळे तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइट आणि अॅपवर तिकीट बुकिंग सेवा मिळणार नाही. अशावेळी तुम्ही दुसऱ्या पर्यायाचा वापर करु शकता. तुम्ही तुम्ही Amazon, Make My Trip सारख्या B2C प्लेयर्सवरुन तिकीट बुक करु शकता."






जाणून घेऊया असे अॅप्स ज्याद्वारे तुम्ही ट्रेनचं तिकीट बुक करु शकता.


Make My Trip
मेक माय ट्रिप ही वेबसाइट तिकीट बुकिंग तसंच ट्रिपच्या नियोजनासाठी खूप लोकप्रिय आहे. इथून तुम्ही केवळ तिकीटंच बुक करु शकत नाही तर हॉटेल, कॅब, ट्रेन, बस आणि फ्लाईट देखील बुक करु शकता. तुमच्या प्रवासाशी संबंधित जवळपास सर्व सुविधा इथे मिळतील. इथून तुम्ही ट्रेनचं तिकीट बुक करु शकता.


Ixigo
ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी Ixigo हा एक उत्तम पर्याय आहे. इथे ट्रेनशी संबंधित सर्व माहितीसह तिकीट बुकिंगची सुविधा देखील मिळते. तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर झिरो कॅन्सलेशन फीचा पर्याय देखील मिळेल.


Trainman 
हे अॅप अलिकडच्या काळात खूप लोकप्रिय झालं आहे. इथे तुम्ही ट्रेनमध्ये सीटची उपलब्धता आणि तिकीट बुकिंग दोन्ही करू शकता. एवढंच नाही तर त्यावर पीएनआर स्टेटस आणि कोचची स्थिती तपासणे यासारखे तपशील उपलब्ध आहेत.


PayTM
बहुतांश लोक पेटीएमचा वापर ऑनलाईन पेमेंटसाठी करतात. तुम्ही इथून रेल्वे तिकीटही बुक करु शकता. तुम्हाला अॅपवरच रेल्वे तिकीट बुकिंगचा वेगळा पर्याय मिळेल. केवळ पेटीएमच नाही तर तुम्हाला Amazon Pay, PhonePe आणि इतर ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्मवर ट्रेन तिकीट बुक करण्याची सुविधा मिळते.


VIDEO : IRCTC Site Crash : IRCTC ची Website 10 तासांपासून बंद, ऑनलाईन बुकिंग सध्या बंद ABP Majha