बंगळुरु : कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील नरसापूर इंडस्ट्रियल भागात असलेल्या तायवान कंपनीच्या कारखान्यात कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे. wistron नावाची ही कंपनी भारतात जगप्रसिद्ध अॅपल कंपनीच्या आयफोनचं उत्पाहृदन करते. कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की, कंपनीने गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांचा पगार दिलेला नाही. अनेक महिन्यांचा पगार थकीत असल्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी आपला राग कंपनीत तोडफोड करुन काढला आहे. कर्मचाऱ्यांनी केलेल्या तोडफोडीमध्ये कंपनीचं थोडं थोडकं नाहीतर तब्बल 437 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवस्थापनाविरोधात आंदोलन करणारे कर्मचारी अचानक हिंसक झाले. काही कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या ऑफिसमध्ये तोडफोड करण्यास सुरुवात केली. याव्यतिरिक्त तिथे उभ्या असलेल्या काही वाहानांना आग लावण्यात आली. तसेच उत्पाती कर्मचाऱ्यांनी फॅक्ट्रीमध्ये दगडफेकही केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजुरांनी कंपनीच्या बोर्डालाही आग लावली.





कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यातील नरसापूर औद्योगिक क्षेत्र आहे. येथे तायवान कंपनी अॅपल आयफोनची निर्मिती करते. या कंपनीच्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं. त्यांनी कंपनीतील काचेचे दरवाजे आणि केबिनची तोडफोड केली. बराच वेळ कर्मचाऱ्यांच्या वतीने हंगामा सुरु होता. कर्मचाऱ्यांनी कारखान्यात उभ्या असलेल्या काही वाहनांनाही आग लावली. तसेच दगडफेकही केली.


घटनेसंदर्भात माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांचा राग शांत झाला नाही. कर्मचाऱ्यांच्या गर्दीतून कोणीतरी रागात पोलिसांच्या गाडीवरही दडगफेक केली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत सर्व कर्मचाऱ्यांना कंपनीमधून बाहेर काढलं. कंपनीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, काही लोकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच पोलीस यासंदर्भात आणखी तपास करत आहेत.