International Yoga Day:  आज आंतराष्ट्रीय योग दिन आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) अमेरिकेत योग दिन साजरा करणार आहेत.  संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे.  आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओच्या माध्यमातून  शुभेच्छा दिल्या आहेत.  सर्वांनी योगसाधना करावी, असे आवाहन मोदींनी या वेळी केली.  तसेच भारताने आवाहन केल्यानंतर जगातील 180 हून अधिक देशात  योग दिन साजरा केला जात आहे.


योग ही जागतिक चळवळ


योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,  2014 मध्ये जेव्हा संयुक्त राष्ट्र महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव आला तेव्हा विक्रमी संख्येने देशांनी त्याला पाठिंबा दिला होता. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून योग ही जागतिक चळवळ बनली आहे.या वर्षी योग ओशन रिंग ऑफ योगाने या दिवसाला अधिक खास बनवले आहेत. याची कल्पना योगाचा विचार आणि समुद्राचा विस्तार यांच्यातील परस्पर संबंधांवर आधारित आहे.


योगामुळे सशक्त समाज निर्माण होतो


आज जगभरातील लोक योग आणि वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेवर एकत्र येत योग करत आहेत. योगाद्वारे आपल्याला आरोग्य, आयुष आणि शक्ती मिळते असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे.आपल्यापैकी अनेक जणांना योगाची उर्जा जाणवली आहे. वैयक्तिक पातळीवर चांगले आरोग्य आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. योगामुळे सशक्त समाज निर्माण होतो. गेल्या काही वर्षांत स्वच्छ भारत ते स्टार्टअप यासारख्या गोष्टींमध्ये विलक्षण गती दिसली, या ऊर्जेचा परिणाम दिसून आला. भारताची संस्कृती असो वा सामाजिक रचना, अध्यात्म असो किंवा आपला दृष्टीकोन... आपण नेहमीच चांगल्या परंपरेचे स्वागत केले आहे. नवीन कल्पनांना स्वीकारले आहे.   






योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदी म्हणाले की, योगाच्या माध्यमातून आपला विरोधाभास संपवायचा आहे. योगाच्या माध्यमातून आपल्याला अडथळे दूर करायचे आहेत. जगासमोर-सर्वोत्तम भारत मांडायचा आहे. योगाबद्दल असे म्हटले जाते की कृतीत कौशल्य म्हणजे योग. हा मंत्र आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. मला खात्री आहे की योगामुळे आपण आपले आरोग्य सुधारू. 


 पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत योग दिन साजरा करणार


 पंतप्रधान नरेंद्र मोदी योग दिन साजरा करणार आहेत. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.25 ते संध्याकाळी 6.30 वाजता संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुतरेस आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या विविध देशातील राजदूत आणि नेते सहभागी होणार आहेत. साधारण 3000 राजदूत सहभागी होणार आहेत.