देशभरात योगदिनाचा उत्साह, चंदीगडमध्ये मोदींचा योग
एबीपी माझा वेब टीम | 21 Jun 2016 02:09 AM (IST)
मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चंदीगडमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला 30 हजार नागरिकांनी सहभागी नोंदवल्याची माहिती आहे. फरिदाबादमध्ये बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत खास कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात जवळपास 1 लाख नागरिक उपस्थित होते. भाजप अध्यक्ष अमित शाहसुद्धा यावेळी उपस्थित होते. यावेळी बाबा रामदेव यांनी उपस्थितांकडून योगासने करुन घेतली. फरीदाबादमधल्या हुडा ग्राऊंडमध्ये या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी सूर्यनमस्कार आणि शीर्षासनासंदर्भात विश्वविक्रम नोंदवला जाण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे. राजधानी दिल्लीतही खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीच्या कॅनॉट प्लेस परिसरात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. नागपुरातही योग दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. नागपूर पालिकेच्या वतीने यशवंत स्टेडिअमवर आयोजित केलेल्या योगदिनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. या कार्यक्रमाला 21 हजार नागरिक उपस्थित असल्याचा अंदाज आहे. संयुक्त राष्ट्रासह अमेरिका, चीन, जपान आणि पाकिस्तानातही योग शिबिर पाहायला मिळत आहेत. जगभरातल्या 193 देशांनी योगविद्येचा स्वीकार केला आहे.