Priyanka Gandhi Vadra : माझ्या मुलांची इंस्टाग्राम (Instagram) अकाउंट हॅक केली जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी केला आहे. याआधी समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव  (Akhilesh Yadav) यांनी फोन टॅपिंग प्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आरोप केले होते. आता प्रियंका गांधींनी देखील राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज प्रयागराज येथे महिला सशक्तीकरण संमेलनात सहभागी झाले होते. त्यावरूनही प्रियांका गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. 'लड़की हूं, लड सकती हूं' या माझ्या शक्ती संवादानंतर आता पंतप्रधानांनाही महिला सबलीकरणासाठी पुढाकार घ्यावा लागला असल्याचा असा दावा प्रियांका गांधी यांनी केलाय. महिला सबलीकरणासाठी पाच वर्षापूर्वी त्यांनी काही घोषणा का केल्या नाहीत? निवडणुकीपूर्वीच ते अशा घोषणा करत असल्याचे गांधी म्हणाल्या. देशातील महिला आता जागृत झाल्या आहेत. याच महिला शक्तीपुढे पंतप्रधानांना झुकावे लागले असून महिलांना हा विजय आनंद देणारा असल्याचे प्रियंका म्हणाल्या.


समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही योगी सरकारवर फोन टॅपिंगचा आरोप केला आहे. माझे आणि माझ्या कार्यालयातील सर्व फोन टॅप केले जात आहेत. खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे काही संभाषणं ऐकत असल्याचा आरोप अखिलेश यांनी केला होता. जर तुम्ही पत्रकार मला संपर्क करणार असाल तर तुमचा फोनही टॅप केला जाईल. यावरून हे सरकार किती निरुपयोगी आहे हे तुम्हीच ओळखा, अशा शब्दांत अखिलेश यांनी सरकारला लक्ष्य केलं होतं. 


उत्तर प्रदेशमधील महिलांनो पंतप्रधान मोदी तुमच्यासमोर झुकले आहेत. 'मगर अभी तो पत्ता हिला है महिला शक्ति का तूफान आने वाला है' असं ट्वीट करत प्रियंका गांधीनी पंतप्रधान मोदींनी एक प्रकारे इशाराच दिला आहे. महिलांनो तुमची सर्वांची एकजूट ही क्रांती करेल असेही गांधी म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  प्रयागराजमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या महिला सशक्तीकरण संमेलनात महिला बचत गटांच्या बँक खात्यांमध्ये १ हजार कोटींची रक्कम हस्तांतरित केली आहे. 202 टेक होम रेशन प्लांटची पायाभरणीही त्यांच्या हस्ते करण्यात आली. पंतप्रधानांनी कन्या सुमंगल योजनेंतर्गत एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांना 20 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली. हजारो वर्षांपासून प्रयागराज ही गंगा-यमुना-सरस्वतीच्या संगमाची भूमी आहे. जी आपल्या मातृशक्तीचे प्रतीक आहे. आज ही तीर्थनगरीही स्त्री आणि शक्तीचा असा अद्भुत संगम पाहत आहे. यूपीमध्ये महिलांच्या विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी जे काम झाले ते संपूर्ण देश पाहत असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.