हैदराबाद : प्रियकराच्या प्रेमात आंधळी झालेल्या एका महिलेचं सुन्न करणारं कृत्य समोर आलं आहे. 'येवडू' या सिनेमातून प्रेरित होऊन महिलेने कट रचला आणि तो पूर्णही केला. परंतु पतीच्या आधार कार्डद्वारे पत्नीच्या षडयंत्राचा पर्दाफाश झाला.


या महिलेने सिनेमाची कहाणी खऱ्या आयुष्यात उतरवण्याचा निर्णय घेतला. तेलंगणाच्या नागरकुर्नुल जिल्ह्यात राहणाऱ्या स्वाती रेड्डी या विवाहित महिलेने प्रियकरासोबत कट रचून पती सुधारक रेड्डीची हत्या केली. मग जंगलात जाऊन दोघांनी पतीचा मृतदेह जाळला.

यानंतर कटानुसार, स्वातीने प्रियकर राजेशच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकलं. त्याची ओळख पटणार नाही, एवढा चेहरा त्याचा भाजला. अॅसिडने प्रियकराचा चेहरा विद्रुप केल्यानंतर महिलेने पतीच्या कुटुंबीयांना सांगितलं की, पतीसोबत मोठी दुर्घटना झाली आहे.

प्रियकरच पती असल्याचं तिने कुटुंबीयांना सांगितलं. यानंतर कुटुंबीयांनी राजेशला सुधाकर समजून रुग्णालयात दाखल केलं, जेणेकरुन त्याची प्लास्टिक सर्जरी करता येईल. सर्जरीनंतर राजेशचा चेहरा काही प्रमाणात सुधाकरसारखा झाला खरा, पण त्याच्या वागणुकीमुळे कुटुंबीयांना त्याच्यावर संशय येऊ लागला.

कुटुंबीयांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सुधाकरच्या आधार कार्डद्वारे प्लास्टिक सर्जरी करुन सुधाकर बनलेल्या राजेशच्या बोटांचे ठसे तपासले. परंतु राजेशच्या बोटांचे ठसे सुधाकरच्या आधार कार्डवरील नमूद ठशांशी जुळले नाहीत. यानंतर स्वाती आणि राजेशच्या कटाचा पर्दाफाश झाला.

स्वाती आणि राजेश यांनी कट रचून 26 नोव्हेंबरला सुधाकरची हत्या केली. स्वाती आणि राजेशच्या षडयंत्राची सुधाकरच्या कुटुंबीयांना कल्पना नव्हती. मुलगा भाजल्याची माहिती मिळातच घाईगडबडीत राजेशलाच आपला मुलगा समजून त्याला रुग्णालयात दाखल केलं. शिवाय त्याच्यावरील उपचार आणि प्लास्टिक सर्जरीसाठी पाच लाख रुपयेही खर्च केले.

स्वाती आणि सुधाकर रेड्डी यांचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना दोन मुलंही आहेत. परंतु काही वर्षांपूर्वी स्वातीची राजेशसोबत ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर स्वाती आणि राजेशने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी सुधाकर रेड्डीचा काटा काढायचं ठरवलं.

हत्या आणि गुन्हेगारी कटाच्या आरोपात स्वाती आणि राजेश यांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.