Rakesh Tikait : भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांच्यावर आज शाईफेक करण्यात आली. बेंगळुरूमधील पत्रकार परिषदे दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी शाईफेक करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. या शाईफेकीमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. शाईफेक करणाऱ्यांना टिकेत यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असल्याचे वृत्त आहे.


गांधी भवनमध्ये शेतकरी नेते राकेश टिकेत आणि युद्धवीर सिंह हे पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. या दरम्यान, एका व्यक्तीने त्यांच्यावर काळी शाई फेकली. हे दोन्ही शेतकरी नेते एका स्टिंग ऑपरेशनबाबत भाष्य करण्यासाठी आले असल्याचे म्हटले जाते. 


पत्रकार परिषद सुरू असताना उपस्थितांमधील काही जणांमध्ये वाद सुरू झाला. या गोंधळातच एकाने शेतकरी नेत्यांवर शाईफेक केली आणि खुर्ची फेकण्यास सुरुवात केली. हा गदारोळ करणाऱ्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. 


स्टिंग ऑपरेशनमध्ये काय?


एका स्थानिक वृत्तवाहिनीने कर्नाटकमधील शेतकरी नेते कोडिहल्ली चंद्रशेखर यांचे स्टिंग ऑपरेशन केले होते. चंद्रशेखर हे पैशांची मागणी करताना कॅमेऱ्यात कैद झाले. या व्हिडिओवर स्पष्टीकरण देण्यासाठी टिकेत आणि युद्धवीर पत्रकार परिषदेत आले होते. चंद्रशेखर यांना कोणत्याही परिस्थितीत आमचा पाठिंबा नसून शेतकऱ्यांना धोका करणाऱ्यांवर कारवाई करावी  अशी मागणी टिकेत करणार होते. 


टिकेत यांची सरकारवर नाराजी


राकेश टिकेत यांनी या प्रकरणी कर्नाटक सरकारवर आरोप केले होते. कर्नाटक पोलिसांनी पुरेशी पोलीस सुरक्षा व्यवस्था न पुरवल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारचा या घटनेला पाठिंबा असल्याचे ही सांगितले.  


इतर महत्त्वाच्या बातम्या: