Narayan Murthy And Sudha Murthy : देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती (Narayana Murthy) आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती (Sudha Murty) रविवारी (16 जुलै) तिरुपती बालाजीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. या जोडप्याने भगवान बालाजी मंदिरासाठी महत्त्वपूर्ण देणगी दिली आहे. नारायण मूर्तींनी सपत्नीक तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे (TTD) सदस्य ए. व्ही. धर्मा रेड्डी यांना ‘सोन्याचा अभिषेक शंख’ आणि ‘कासव’ देणगी म्हणून सुपूर्द केले. त्यांनी केलेलं हे सोन्याचं दान तब्बल दोन किलोच्या आसपास असल्याचं सांगितलं जात आहे.


दोन किलो वजनाचा सोन्याचा शंख आणि कासव दान


सुधा मूर्ती यापूर्वी तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टच्या सदस्या होत्या. मूर्ती दाम्पत्याने सोन्याचा शंख आणि ‘कासव तिरुपती बालाजी मंदिराला दान केले. या दोघांचे वजन सुमारे 2 किलो आहे. या खास प्रसंगी दोघेही मंदिराच्या रंगनायकुला मंडपममध्ये गेले होते. मूर्तींनी याआधी देखील तिरुपती बालाजी मंदिराला देणग्या दिल्या आहेत. तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ट्रस्ट बोर्डाच्या माजी सदस्या आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती यांनी यापूर्वी देखील मंदिराला सोन्याच्या अभिषेक शंखाचे दान केले होते.


कशी आहे दान केलेल्या शंख आणि कासवाची रचना?


नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी दान केलेल्या 'अभिषेक शंखा'ची रचना खास पद्धतीने करण्यात आली आहे. शंखाचं तोंड एका बाजूने खुलं आहे. याशिवाय मूर्ती दाम्पत्याने 'कूर्म' अर्थात कासवही दान केलं आहे. या दोन्हींचा उपयोग स्वामी अम्मावारांच्या अभिषेकात केला जातो. कूर्माचा पाठीचा भाग रिकामा ठेवण्यात आला आहे, जो शंख ठेवून भरला जातो. मूर्ती दाम्पत्याने केलेल्या या दानाला 'भुरी' दान असंही म्हणतात.


दान केलेल्या सोन्याच्या वस्तूंची किंमत 1.25 कोटी?


सध्याच्या बाजार मूल्यानुसार सोन्याच्या शंख आणि कासवाची किंमत सुमारे 1.25 कोटी रुपये आहे. सध्या बाजारात सोन्याची सरासरी किंमत 61,100 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. त्यानुसार 2 किलो सोन्याची अंदाजे किंमत 1.25 कोटी रुपयांच्या घरात असू शकते.


दान देण्याची प्राचीन परंपरा


तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात प्राचीन काळापासून राजे आणि महाराजे सोने, रोकड आणि जमीन दान करत आले आहेत. सध्याही लोक या मंदिरात सोने, रत्न, दागिने आदी गोष्टी दान करतात. विशेष म्हणजे मोठे नेते, अभिनेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटी या मंदिरात आवर्जून जातात. असं म्हणतात की, अशा दानाने भगवान व्यंकटेश त्यांच्या समस्या सोडवतात.


दरम्यान, पीटीआयच्या अहवालानुसार, श्री व्यंकटेश्वर अलयाला निर्माणम ट्रस्ट (श्रीवानी ट्रस्ट), TTD उपक्रमाने गेल्या पाच वर्षांत किमान 10 हजार रुपये देणगी देणाऱ्या भक्तांकडून 880 कोटी रुपये मिळवले आहेत.


हेही वाचा:


Sawan Somwar: श्रावणी सोमवारच्या निमित्ताने करा या गोष्टींचं दान; शंकराची होईल कृपा