चेन्नई : चेन्नईतील एका रेल्वे स्थानकावर इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची भरदिवसा धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे घटनेदरम्यान रेल्वेस्थानकावर गर्दी होती. मात्र, या तरुणीला वाचवण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही. शिवाय, जवळपास दोन तास मृतदेह रेल्वेस्थानकावरच पडून होतं. स्वाती असं या मृत तरुणीचं नाव आहे.

 

ऑफिसला जात असताना हत्या

 

रोजच्यासारखं कामाला जात असताना तरुणीवर धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. प्राथमिक तपासानुसार, तरुणी इन्फोसिस कंपनीत कामाला असून, ती रोजच्यासारखीच ऑफिसला जात होती. हत्येच्या अगदी काही वेळापूर्वीच तरुणीच्या वडिलांनी तिला ननगंबक्कम स्थानकावर सोडून गेले होते. त्यानंतर आपल्या लोकची वाट पाहात तरुणी स्थानकावर उभी होती. आजूबाजूला अने प्रवासही होते.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणीचे वडील केंद्र सरकारच्या सेवेतून निवृत्त झाले आहत. चुलाईमेडूच्या दक्षिण गंगई भागात ते राहतात. 24 वर्षीय स्वातीसोबत घडलेली या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचं डोंगर कोसळलं आहे.

 

काय झालं प्लॅटफॉर्मवर?

 

स्वाती जेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभी होती. त्यावेळी काळी पँट परिधान केलेला एक तरुण मागून आला आणि स्वातीशी काही वेळ बोलला. त्यानंतर आपल्या बॅगमधून धारदार शस्त्र काढून तिच्यावर हल्ला केला. त्यातच स्वातीचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

चेहरा आणि गळ्यावर वार

 

पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणीच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार केले गेले. प्लॅटफॉर्मवर काही अंतरापर्यंत रक्त पसरलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे प्लॅटफॉर्मवर गर्दी असतानाही, कुणी वाचवण्यासाठी पुढे आला नाही. किंवा हत्या करणाऱ्या तरुणाला पकडण्याचाही कुणी प्रयत्न केला नाही.

 

पोलिसांचा हलगर्जीपणा, रेल्वेस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरेही नाहीत!

 

प्रत्येक रेल्वे स्थानकावर किमान सुरक्षाव्यवस्था असते. सुरक्षेसाठी आरपीएफ आणि कायदा-सुवव्यवस्थेसाठी जीआरपी असतात. मात्र, चेन्नईतील या खळबळजनक घटनेवेळी तिथे कुणीही नव्हतं. धक्कादायक म्हणजे रेल्वेस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरेही नाहीत.

 

इन्फोसिसकडून दु:ख व्यक्त

 

या घटनेनंतर इन्फोसिस कंपनीने दु:ख व्यक्त केलं असून, यावेळी आपण तरुणीच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत, असेही इन्फोसिसने म्हटलं आहे. शिवाय, तरुणीच्या कुटुंबीयांना लागणारी मदत देण्याची तयारीही इन्फोसिसने दर्शवली आहे.