भारत-पाकिस्तान सीमा सील करणार : गृहमंत्री
एबीपी माझा वेब टीम | 07 Oct 2016 02:15 PM (IST)
नवी दिल्ली : पाकिस्तानची नांगी ठेचण्यासाठी मोदी सरकारने जालीम उपाय शोधला आहे. 2018 पर्यंत भारत-पाकिस्तानची संपूर्ण सीमारेषा सील करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यासंदर्भात घोषणा केली. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या चार राज्यांमधील सध्याच्या सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करण्यासाठी गृहमंत्री आज जैसलमेरला दाखल झाले. पाकिस्तानला लागून असलेल्या राजस्थान, पंबाज, गुजरात आणि जम्मू-काश्मीर या चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत गृहमंत्र्यांनी बैठक घेतली. या बैठकीत इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन सीमेप्रमाणे, भारत-पाकिस्तान सीमेवर काँक्रिट भिंत उभारुन ती सील करण्याचा निर्णय घेण्यात आला. ठरलेल्या वेळेतच हे काम पूर्ण करणार असून कामावर देखरेख ठेवली जाईल, असं आश्वासनही राजनाथ सिंह यांनी दिलं.