नवी दिल्ली : विमानात डासांनी थैमान घातल्याची तक्रार केल्यामुळे इंडिगो कंपनीने आपल्याला विमानातून उतरवल्याचा आरोप एका प्रवाशाने केला आहे. इंडिगो विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याची तक्रारही सौरभ रायने केली आहे.


'लखनौहून बंगळुरुला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात डासांचं साम्राज्य होतं. मी याविषयी आक्षेप घेताच विमानातील क्रूने मला धक्काबुक्की केली आणि विमानातून उतरवलं. मला धमकावण्यातही आलं' असं सौरभने 'एएनआय'ला सांगितलं.

इंडिगो विमान कंपनीने मात्र सौरभचे आरोप फेटाळले आहेत. 'सौरभ राय नावाचा प्रवासी सकाळी लखनौहून बंगळुरुला जाण्यासाठी इंडिगोच्या विमानात बसला. परंतु त्याच्या बेलगाम वर्तनामुळे त्याला उतरवण्यात आलं. डासांबाबत त्याने तक्रार नोंदवली, मात्र केबिन क्रूने त्याची दखल घेण्यापूर्वीच तो आक्रमक झाला आणि धमकावण्याची भाषा करु लागला' असं इंडिगोने सांगितलं.

'विमानाचे दरवाजे बंद झाल्यामुळे सौरभने सहप्रवाशांना विमानाची नासधूस करण्यास चिथावलं. त्याचप्रमाणे 'हायजॅक' या शब्दाचाही वापर केला. सुरक्षा प्रोटोकॉल लक्षात घेऊन पायलटने त्या प्रवाशाला खाली उतरवण्याचा निर्णय घेतला.' असंही इंडिगोच्या वतीने सांगण्यात आलं.

यापूर्वीही प्रवाशांसोबत गैरवर्तन केल्यामुळे इंडिगो विमान कंपनीवर टीकेची झोड उठली होती. सोशल मीडियावर सर्वसामान्यांपासून एअरलाईन्स कंपनीतील प्रतिस्पर्ध्यांनी इंडिगोला ट्रोल केलं होतं. त्यामुळे हे प्रकरण इंडिगोला महागात पडू शकतं.