Varun Gandhi Member of the Lok Sabha : खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज असलेले वरुण गांधी वारंवार मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. गुजरातमधील एबीजी शिपयार्ड घोटाळा उघड झाल्यानंतर आता वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाभ्रष्ट व्यवस्थावर एक ‘मजबूत सरकार' ऐवजी ‘मजबूत कार्यवाही'ची अपेक्षा असल्याचे ट्विट वरुण गांधी यांनी केलं आहे. 


गेल्या काही दिवसांपासून वरुण गांधी पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत. अशातच ट्विटरवरुन वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले की, देशावर कर्ज वाढतच चालले आहे, त्यामुळे लोक आत्महत्या करत आहेत. वरुण गांधी यांनी विजय माल्य, निरव मोदी आणि ऋषी अग्रवाल यांचे नाव घेत म्हटलेय की, घोटाळा करुन हे लोक ऐशोआरामात जगत आहे. पण सर्वसामान्य लोकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये कथित कोट्यवधींच्या घोट्याळाचाही उल्लेख केला आहे. दरम्यान, याआधी वरुण गांधी शेतकरी आंदोलनाचं समर्थन करतानाही दिसले होते. 


काय आहे वरुण गांधी यांचे ट्विट?
विजय माल्या : 9000 कोटी
नीरव मोदी: 14000 कोटी
ऋषी अग्रवाल: 23000 कोटी
सध्यास्थितीला कर्जाच्या ओझ्याखाली देशात दररोज सरासरी 14 जण आत्महत्या करत आहेत. अशात भ्रष्ट्राचारी लोक ऐशोआरामात जगत आहेत. या महाभ्रष्ट व्यवस्थावर एक ‘मजबूत सरकार' ऐवजी ‘मजबूत कार्यवाही'ची अपेक्षा केली जात आहे.  






दरम्यान, उद्योगपती विजय माल्यावर अनेक बँकाकडून घेतलेले 9000 कोटी कर्ज न चुकवल्याचा आरोप आहे. तसेच नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकमध्ये 14000 कोटींपेक्षा जास्त घोटाळा केल्याचा आरोप आहे. नुकताच एबीजी शिपयार्ड लिमिटेडचे माजी चेअरमन ऋषी अग्रवालचे नाव समोर आले आहे. अग्रवालने 22,842 कोटी रुपयांचा गोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा सीबीआय तपास करत आहे. सीबीआय मुख्य आरोपी ऋषी अग्रवाल (Rishi Agarwal) याची चौकशी करत आहे.