Dr. B.V. Doshi Passes Away: भारताचे दिग्गज, विख्यात वास्तुविशारद डॉ. बालकृष्ण विठ्ठलदास दोशी (Dr. B.V. Doshi Passes Away) यांचे अहमदाबाद येथील राहत्या घरी निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. डॉ. बी. व्ही. दोशी हे विख्यात वास्तुविशारद आणि शहर नियोजनकार होते. त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. वास्तुविशारद क्षेत्रातील नोबेल समजल्या जाणाऱ्या प्रित्झकर पुरस्काराने (Pritzker Prize) सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने सन्मानित होणारे हे पहिले भारतीय होते.
डॉ. बालकृष्ण दोशी यांनी ली कार्बुजिअर आणि लुई कान यांसारख्या दिग्गज वास्तुविशारदासह काम केले होते. दोशी यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या निधनाबाबत माहिती दिली.
पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करताना म्हटले की, बी. व्ही. दोशीजी हे एक उत्कृष्ट वास्तुविशारद आणि उत्कृष्ट संस्था निर्माते होते. येणाऱ्या पिढ्यांना त्याच्या महानतेची झलक दिसून येईल. त्यांचे निधन दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या दु: खात सहभागी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
कोण होते डॉ. दोशी?
वास्तुविशारद डॉ. बालकृष्ण दोशी यांचा जन्म 1927 मध्ये पुण्यात झाला. त्यांनी कार्बुजिअर सारख्या दिग्गज वास्तुविशारदांसह काम केले. त्यांनी लुई कान यांच्यासह आयआयएम अहमदाबाद आणि देशातील इतर महत्त्वाच्या संस्थांच्या इमारतींच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले.
इंडोलॉजी संस्थान, सीईपीटी विद्यापीठ, अहमदाबादमधील कनोरिया कला केंद्र, आयआयएम बंगळुरू, इंदूरमधील अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठीच्या 'अरन्या लो कॉस्ट हाऊसिंग' आदी प्रकल्पांची वास्तुरचना त्यांनी केली. वास्तुकलेसाठी इंदूरमधील वस्तीला 1995 मध्ये प्रतिष्ठित आगा खान पुरस्कार मिळाला. महान चित्रकार एम. एफ. हुसैन यांच्यासोबत असलेल्या मैत्रीच्या आठवणीत त्यांनी अहमदाबादमध्ये हुसैन-दोशी केव्ह (Hussain Doshi Cave) हे कला दालन उभारले. अहमदाबाद नी गुफा (Amdavad ni Gufa) या नावाने हे कलादालन प्रसिद्ध आहे. हे कलादालन भूमिगत आहे.
पुरस्कारांनी सन्मानित
आर्किटेक्चरच्या क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल, त्यांना 2018 मध्ये प्रित्झकर पुरस्कार, 2021 मध्ये RIBA चे रॉयल गोल्ड मेडल आणि 1976 मध्ये प्रतिष्ठित पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते.