भारताचे पहिले मिस्टर युनिव्हर्स मनोहर एच कालवश
एबीपी माझा वेब टीम | 06 Jun 2016 03:30 AM (IST)
कोलकाता : भारताचे पहिले मिस्टर युनिव्हर्स आणि प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू मनोहर एच यांचं कोलकातामधील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालं. ते 104 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि दोन मुली असं कुटुंब आहे. 1952 मध्ये भारताचे पहिले मिस्टर युनिव्हर्स बनण्याचा मान मनोहर एच यांना मिळाला. मिस्टर युनिव्हर्स बनल्यानंतर पश्चिम बंगालच नव्हे तर देशभरात त्यांची ओळख निर्माण झाली. मनोहर मागील काही दिवसांपासून आजारी होते. गेल्या 10 ते 15 दिवसांपासून त्यांनी अन्न त्याग केला होता. अखेर रविवारी सकाळी मनोहर यांनी 3 वाजून 50 मिनिटांनी जगाचा निरोप घेतला, अशी माहिती मनोहर यांचे पुत्र खोकन एच यांनी दिली. मनोहर यांचा एक मुलगा तरुणांना बॉडीबिल्डिंगचे धडे देण्यासाठी फिटनेस जीम चालवतो. उत्तम जेवण आणि दररोज व्यायाम हा मनोहर एच यांच्या आरोग्यदायी जीवनाचा मंत्र होता, असंही खोकन यांनी सांगितलं.