नवी दिल्ली : भारतीय सांखिकी संस्थेच्या (ISI) प्राध्यापक नीना गुप्ता यांना गणितातील सर्वात श्रेष्ठ पुरस्कारांपैकी असलेला रामानुजन पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या गुप्ता या चौथ्या भारतीय गणित तज्ञ ठरल्या आहेत. नीना गुप्ता यांना बीजगणितीय भूमिती आणि कम्युटेटिव्ह बीजगणित मधील उत्कृष्ट कार्यासाठी विकसनशील देशांतील तरुण गणितज्ञांसाठी दिल्या जाणाऱ्या 2021 DST-ICTP-IMU रामानुजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रामानुजम पारितोषिक जिंकणारी ती जगातील तिसरी महिला आहे. आतापर्यंत रामानुजम पुरस्कार मिळालेल्या चार भारतीयांपैकी तीन भारतीय सांख्यिकी संस्थेचे (ISI) प्राध्यापक आहेत. त्यातील एक नीना गुप्ता आहेत.
गणिताच्या क्षेत्रात नवा ठसा उमटवणाऱ्या 45 वर्षांखालील तरुण गणितज्ञांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रामानुजन पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार पहिल्यांदा 2005 मध्ये देण्यात आला होता. अब्दुस सलाम इंटरनॅशनल सेंटर फॉर थिओरेटिकल फिजिक्स (ICTP) आणि विज्ञान, तंत्रज्ञान विभाग (DST), भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय गणितीय संघ (IMU) यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला जातो.
नीना गुप्ता यांना याआधी 2019 मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2014 मध्ये, त्यांना बीजगणितीय जिओमेट्रो क्षेत्रातील झारिस्की रद्दीकरण समस्या सोडवल्याबद्दल राष्ट्रीय विज्ञान अकादमीने यंग सायंटिस्ट पुरस्काराने सन्मानित केले होते.
जगभरातील प्रख्यात गणितज्ञांचा समावेश असलेल्या DST-ICTP-IMU रामानुजन पारितोषिक समितीने पुरस्कार जाहीर करताना गुप्ता यांच्या कार्याची प्रशंसा केली. "प्राध्यापक गुप्ता यांचे कार्य, त्यांचे प्रभावी बीजगणितीय कौशल्य आणि शोधकता दर्शवते. असे या समितीने म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या