नवी दिल्ली : रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांसाठी एका आनंदाची बातमी आहे. आता थर्ड एसी कोचच्या तिकिटामध्येही तुम्ही एसी कोचमधून प्रवास करु शकता. भारतीय रेल्वे लवकरच इकॉनॉमी रेल्वे कोच आणणार आहे. या इकॉनॉमी एसी कोचचे तिकीट दर थर्ड एसी कोचच्या तिकीट दरापेक्षाही कमी असतील.


कमी दरात इकॉनॉमी एसी कोच

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इकॉनॉमी एसी कोच या नव्या कोचचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या कोचचे तिकीट दर नेहमीच्या 3 एसीपेक्षाही कमी असतील.

मेट्रोसारखे ऑटोमेटिक दरवाजे

रेल्वेच्या नव्या संपूर्ण एसी ट्रेनमध्येमध्ये आता 3 एसी, सेकंड एसी आणि फर्स्ट एसी क्लाससोबतच थ्री टायर इकॉनॉमी एसी कोचचाही समावेश असेल. या नव्या कोचचे दरवाजे मेट्रोसारखे ऑटोमेटिक असतील.



विमानाच्या इकॉनॉमी क्लाससारखा ट्रेनमध्ये इकॉनॉमी एसी क्लास

विमानांमध्ये ज्याप्रकारे इकॉनॉमी क्लास असतो, त्याच धर्तीवर आता रेल्वेमध्ये इकॉनॉमी एसी क्लासची सुरुवात केली जात आहे. विशेष म्हणजे रेल्वेच्या नव्या इकॉनॉमी एसी क्लासमध्ये इतर एसी कोचसारखं चादरींची वगैरे गरज भासणार नाही. कारण या कोचमधील तापमान 24 ते 25 डिग्रीदरम्यान असेल.

इकॉनॉमी क्लासमागील उद्देश काय?

रेल्वे आणि रेल्वे स्थानकं यांना आधुनिक करुन सेवेतही बदल करण्याचा भारतीय रेल्वेचा उद्देश आहे. रेल्वेने या नव्या सुविधांसाठी, बदलांसाठी एक वेगळं सेल तयार केलं आहे. सध्या मेल आणि एक्स्प्रेसमध्ये स्लीपर, थर्ड एसी, सेकंड एसी आणि फर्स्ट एसी कोच आहेत. राजधान, शताब्दी, हमसफर, तेजस या रेल्वे पूर्णपणे एसी कोच असलेल्या गाड्या आहेत.