राजधानीसह शताब्दी एक्स्प्रेसमध्ये लवकरच स्वयंचलित दरवाजे
एबीपी माझा वेब टीम | 13 Feb 2017 02:51 PM (IST)
मुंबई : रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी लवकरच रेल्वे गाड्यांच्या डब्यांना स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार आहेत. हे स्वयंचलित दरवाजे फक्त रेल्वे स्थानकांमध्येच उघडले जातील. या स्वयंचलित दरवाज्यांचं नियंत्रण गार्डच्या केबिनमधून चालेल. दरवाजात उभे राहून प्रवास करण्यामुळे वाढलेल्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील रेल्वेच्या राजधानी आणि शताब्दी गाड्यांमध्ये एप्रिल महिन्यापासून स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार आहेत. गाडी स्टेशनवर दाखल झाल्यावर गाडीचे सर्व डबे उघडले जातील, तर गाडी स्टेशनमधून रवाना होण्यापूर्वी सर्व दरवाजे बंद केले जातील. ही सर्व यंत्रणा स्वयंचलित असेल. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता वाढवणे आणि वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. स्वयंचलित दरवाज्यांची प्रणाली सध्या फक्त राजधानी आणि शताब्दी रेल्वेमध्येच बसवण्यात येईल, तसंच हळूहळू इतर सर्व रेल्वेगाड्यांमध्येही कार्यान्वित करण्यात येईल. स्वयंचलित दरवाज्याच्या प्रणालीसाठी प्रत्येक डब्यामागे 20 लाखांचा खर्च केला जाणार आहे. गाडीचा दरवाजा बंद करण्याचे सर्व नियंत्रण गार्डकडे असेल. तसंच दरवाजा उघडा असल्यास गाडी सुरुच होणार नाही अशी यंत्रणाही या प्रणालीमध्ये असेल.