नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने एक अनोखा विश्वविक्रम नोंदवला आहे. जगातील सर्वात मोठी ऑनलाईन टेस्ट भारतीय रेल्वेने घेतली. 18 हजार जागांवर भरतीसाठी भारतीय रेल्वेकडून ही ऑनलाईन टेस्ट घेण्यात आली होती.


भारतीय रेल्वेने काही दिवसांपूर्वी 18 हजार जागांच्या नव्या भरतीसाठी ऑनलाईन टेस्ट घेतली. विशेष म्हणजे 18 हजार जागांसाठी तब्बल 92 लाख जणांनी अर्ज केले होते. त्यानंतर भारतीय रेल्वेने ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून प्री-एक्झाम घेतली. त्यामधून 2 लाख 73 हजार जण पास झाले आणि या 2 लाख 73 हजार जणांची 17 ते 19 जानेवारीदरम्यान लेखी परीक्षा घेण्यात आली.

https://twitter.com/sureshpprabhu/status/830373815167369216

रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ग्रुप-3 मधील 18 हजार जागांसाठी ऑनलाईन टेस्ट घेण्यात आली होती. यामध्ये सहाय्यक स्टेशन मास्तर, गुड्स गार्ड्स, चौकशी-कम-आरक्षण लिपिक, ट्राफिक आणि कमर्शियल अप्रेंटिस, ज्युनियर अकाऊंटंट असिस्टंट या पदांचा समावेश आहे.

याआधी भारतीय रेल्वेकडून नोकरीसाठी ज्या काही परीक्षा व्हायच्या, त्या सर्व लेखी स्वरुपात असायच्या. मात्र, पेपर लीक किंवा इतर अनेक समस्या समोर येत असल्याने ऑनलाईन टेस्ट घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

आता ऑनलाईन टेस्टमध्ये पास झालेल्या उमेदावारांची मानसिक चाचणी केली जाईल. येत्या मे महिन्यापर्यंत पास झालेल्या सर्व उमेदवारांना नियुक्ती पत्रही पाठवलं जाईल.

रेल्वेमध्ये काम करु इच्छिणाऱ्या तरुणांना आणखी एक खुशखबर म्हणजे येत्या काळात आणखी 20 हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु केली जाणार आहे. पुढील भरती लोको पायलट, टेक्निकल सुपरवायझर या पदांसाठी असेल.