नवी दिल्ली: भारतात दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिवस साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 1971 च्या युध्दात भारतीय नौदलानं पाकिस्तानला धूळ चारली होती. त्याच विजयाच्या स्मरणार्थ भारतात 4 डिसेंबर हा दिवस नौदल दिवस म्हणून साजरा केला जातोय. भारतीय सेनेच्या एअरस्पेसवर 3 डिसेंबर 1971 च्या दिवशी पाकिस्तानच्या लष्कराने हल्ला केला. पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतरच 1971 सालच्या युध्दाला तोंड फुटलं. पाकिस्तानच्या या आगळीकतेला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय नौदलानं ऑपरेशन त्रिशूल (ट्रायडन्ट) सुरु केलं.


ऑपरेशनच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या नौदल मुख्यालय असलेल्या कराची बेसला लक्ष करण्यात आलं. भारतीय नौदलानं 4 डिसेंबरच्या रात्री कराची बंदरावर केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या अनेक लष्करी विमानांचं नुकसान झाले. त्यामुळे पाकिस्तानची भारतावर बॉम्ब वर्षाव करण्याची क्षमता कमी झाली. त्यात भारताच्या नौदलाच्या वतीनं पहिल्यांदाच अॅन्टी शीप मिसाईलचा वापर करण्यात आला होता. भारतीय नौदलाच्या या प्रखर हल्ल्यात पाकिस्तानच्या नौदलाचं आणि कराची बंदराचं अतोनात नुकसान झालं. या दरम्यान पाकिस्तानच्या तेलाच्या टॅन्करनाही लक्ष करण्यात आलं होतं. भारतीय नौदलाच्या या अफाट कामगिरीमुळं पाकिस्तानच्या नौदलाचं तसंच हवाई दलाचं कंबरडं मोडलं.


भारतीय नौदलाच्या या अफाट कामगिरीमुळं पाकिस्तानच्या नौदलाचं तसंच हवाई दलाचं कंबरडं मोडलं. त्यांची एक बाजू कमकुवत होऊन त्याचा परिणाम युध्दाच्या रणनीतीवर झाला. भारतीय नौदलाच्या हल्ल्यानं युध्दाचं चित्रच पालटलं आणि पुढच्या केवळ 13 दिवसात भारतानं पाकिस्तानविरुध्दचं 1971 चे युध्द जिंकलं. परिणामी पाकिस्तानचे दोन तुकडे पडले आणि बांग्लादेश स्वातंत्र्य झाला.


भारतीय नौदलाची सुरुवात ईस्ट इंडियाच्या काळात झाल्याचं मानण्यात येतं. ईस्ट इंडिया कंपनीनं आपल्या व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी नौदलाची एक टीम तयार केली. नंतर याचं नामकरण रॉयल इंडियन नेव्ही असं करण्यात आलं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1950 साली रॉयल इंडियन नेव्ही हे नाव बदलण्यात आलं आणि भारतीय नौदल अर्थाच इंडियन नेव्ही असं ठेवण्यात आलं.


भारतीय नौदल दिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. त्याची तयारी विशाखापट्टनमच्या इंडियन नेव्हीच्या बेसवर करण्यात येते. सुरुवातीला युध्द स्मारकाला पुष्प अर्पण केलं जातं आणि नंतर नौदलाच्या पाणबुडी, जहाजं आणि विमानांच्या ताकतीचं आणि कसरतींच प्रदर्शन करण्यात येतं.