नवी दिल्ली : वाहन चालक परवान्यासाठी असलेली किमान शिक्षणाची अट शिथिल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बस, ट्रक आणि माल वाहतूकीसाठी चालकांना रोजगार मिळावा, यासाठी किमान अर्हता घटवणार असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलं. आतापर्यंत ड्राईव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी किमान आठवी पास असणं आवश्यक होतं.


केंद्रीय मोटर वाहन 1989 च्या नियम 8 मध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून लवकरच त्यासंबंधी परिपत्रक जारी करण्यात येईल. देशात मोठ्या संख्येवर बेरोजगार युवक आहेत, जे सुशिक्षित नसले, तरी कुशल आणि साक्षर आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुशल कामगारांना रोजगार मिळावा, यासाठी ही पावलं उचलण्यात आली आहेत.

बस, ट्रक आणि माल वाहतुकीचा वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रतेची अट शिथिल केल्यास अधिकाधिक जणांना रोजगार मिळू शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सध्या जवळ वाहतूक आणि माल वाहतूक क्षेत्रात जवळपास 22 लाख चालकांची कमतरता आहे. शिक्षणाची अट शिथिल केल्याने ही तूट भरुन निघेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकतीच यासंदर्भात एक बैठक घेतली होती, त्यावेळी हरियाणा सरकारने याला विरोध केला होता. मात्र शैक्षणिक अर्हता हटवली तरी प्रशिक्षण आणि कौशल्य चाचणीवर केंद्राकडून भर देण्यात आला आहे. रस्ते वाहतूक सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.