चेन्नई : चेन्नईमधील एका शेतकऱ्याने वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलंय. हे स्वप्न आहे लहानपणी पाहिलेल्या मर्सिडिज गाडीचं. त्यांनी पहिल्यांदा जेव्हा ही आलिशान गाडी पाहिली तेव्हाच एक दिवस त्यात बसण्याचा निर्धार केला. देवराजन असं या शेतकऱ्याचं नाव आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी मर्सिडीज बेंझ बी-क्लास ही लक्झरी कार विकत घेतली.

देवराजन राहात असलेल्या खेड्यात सायकल किंवा बैलगाडी हीच प्रवासाची साधने. पण त्यांनी कुठेतरी मर्सिडिज कार पाहिली, तेव्हा त्यांना ही कार कोणत्या कंपनीची आहे, हे ही माहिती नव्हतं. त्यांनी त्यावेळी फक्त मर्सिडिजचा वर्तुळातील त्रिकोणी चांदणी लक्षात ठेवली. हा लोगो जगप्रसिद्ध मर्सिडिज कार कंपनीचा आहे हे समजल्यावर त्यांनी ती गाडी एक दिवस विकत घ्यायचीच हे ध्येय निश्चित केलं.

मर्सिडिज कार विकत घेण्यासाठी चेन्नईतील मर्सिडिज शोरूम कर्मचाऱ्यांना ही माहिती समजल्यावर त्यांनी देवराजन यांचं खास आदरातिथ्य केलं.



देवराजन आपल्या पत्नीसह आपल्या स्वप्नातील कारच्या डिलीव्हरीसाठी चेन्नईतील ट्रान्स कार या मर्सिडिज शोरूममध्ये गेल्यावर त्यांच्यासाठी केक मागवण्यात आला. त्यांना त्यांच्या गाडीची चावीही समारंभपूर्वक देण्यात आली. हा सर्व समारंभ चित्रित करण्यात आला. ट्रान्स कार या मर्सिडिज शोरूमने हा सर्व व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवरही प्रकाशित केलाय.

लहानपणी बैलगाडीतून सुरू झालेला प्रवास तब्बल 80 वर्षांच्या खडतर कष्टानंतर मर्सिडिज पर्यंत येऊन पोहोचला. आपल्या या प्रवासात आपल्या पत्नीची साथ सर्वाधिक मोलाची असल्याचं देवराजन आवर्जून सांगतात.