सिक्कीम : भारत आणि चीनमधील तणाव सातत्याने वाढत आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झटापट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उत्तर सिक्कीमच्या के नाकू ला सीमेवर तीन दिवसांपूर्वी दोन्ही देशांच्या सैन्यात संघर्ष झाला. पेट्रोलिंग करणाऱ्या चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारतीय सैन्याने प्रतिकार केला. यामध्ये भारत आणि चीनचे काही सैनिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. परंतु सैन्याकडून या वृत्ताबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात परंतु तणावाची असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, कालच (24 जानेवारी) भारत आणि चीनमध्ये कोअर कमांडर यांच्यात 17 तासांची मॅरेथॉन बैठक झाली होती. सकाळी साडेनऊ वाजता सुरु झालेली ही बैठक रात्री अडीच वाजता संपली. चीननेच ही बैठक बोलावली होती. भारतीय सैन्याकडून लेहमधील चौदाव्या कोअर कमांडरचे लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांनी चर्चा केली. चीनच्या बीएमपी हट मोल्डोमध्ये झालेल्या या बैठकी नेमका काय तोडगा निघाला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सीमेवरील तणाव कमी करावा आणि सैनिक मागे घेण्यासंदर्भात ही बैठक होती.
भारत-चीन वाद सुटणार?
भारत-चीनमध्ये आतापर्यंत चर्चेच्या नऊ फेऱ्या झाल्या आहेत, परंतु त्यात अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशातील अधिकारी भेटून चर्चा करत आहे. मागील वर्षी म्हणजेच मे 2020 पासून पूर्व लडाखजवळच्या 826 किलोमीटर लांबीच्या लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल म्हणजेच एलएसीवर चिनी सैन्याने कोरोना महामारीदरम्यान अनेक ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. याच दरम्यान गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती.
गलवान खोऱ्यात हिंसक झटापट; भारताचे 20 सैनिक शहीद, चीनचंही मोठं नुकसान
जून महिन्यात गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती. सीमेवरील या झटापटीत भारताच्या 20 सैनिकांना वीरमरण आलं होतं. तर यामध्ये चीनच्या बऱ्याच सैनिकांचा मृत्यू झाला होता. याशिवाय हॉट-स्प्रिंग, गोगरा आणि फिंगर एरियामध्येही चिनी सैनिकांनी खुसखोरीचा प्रयत्न केला होता. फिंगर-एरिया 4 पासून फिंगर एरिया 8 पर्यंत चिनी सैनिकांनी पहिल्यांदाच ताबा मिळवलून आपल्या सैनिकांसाठई बॅरेक, ट्रेंच आणि हेलिपॅड सुद्धा तयार केले होते. यावरुनही दोन्ही देशांमधल्या सैनिकांमध्ये झटप झाली होती.