नवी दिल्ली : भारतीय सैन्यदलाने आज पाकिस्तानला आज चांगलाच दणका दिला. शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकच्या चौक्या उध्वस्त करत जशास तसं उत्तर दिलं आहे. सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्याने चांगलाच धडा शिकवला आहे.  पाकिस्तानकडून सातत्याने कुपवाडा सेक्टर,  उत्तर काश्मीर आणि केजी सेक्टर नजीक गोळीबार सुरु होता. त्यामुळे भारतीय सैन्याने कुपवाडा सेक्टरच्या विरुद्ध दिशेला असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आणि तोफगोळे डागून उद्धस्त केल्या आहेत.

भारतीय सैन्याच्या या कारवाईचा एक व्हिडीओ समोर आला आहे.  भारताकडून आधीच पाकच्या अशा नापाक हरकतींना इशारा देण्यात आला आहे. जर पाकिस्तानने अशी घुसखोरी आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन थांबवले नाही तर त्यांची किंमत त्यांना मोजावी लागेल, असं स्पष्ट करण्यात आलं होतं.


पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरांना घुसवण्यासाठी सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. त्याला आधी इशारा दिल्यानंतरही वारंवार तीच चूक केल्यामुळे आता  भारतीय सैन्याने दिलेले हे जोरदार प्रत्युत्तर आहे. भारतीय सैन्याने या कारवाईचा व्हिडीओ पोस्ट केला असून, त्यामध्ये पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या उध्वस्त झाल्याचे दिसत आहे.

सीमेवर शस्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानी सैन्याकडून सतत मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला जात असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. पाकिस्तानी सैन्याकडून उत्तर काश्मीर आणि केजी सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागाला मिळाली होती. यामुळे भारतीय लष्कराच्या जवानांचा या भागात पहारा वाढवण्यात आला होता. याच दरम्यान पाकिस्तानी रेंजर्सनी सीमेवर जोरदार गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला भारतीय लष्कराने दणक्यात प्रत्युत्तर देत त्यांच्या चौक्या उध्वस्त केल्या आहेत.