Agniveer Recruitment : सैन्य भरतीसाठी केंद्र सरकार अग्निपथ योजनेवर ठाम आहे. आजपासून भारतीय लष्करात अग्निपथ योजनेनुसार आजपासून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने यासाठी अर्ज करता येणार आहे. एका बाजूला अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत असताना दुसरीकडे आता भरती प्रक्रियेला कसा प्रतिसाद मिळतो याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या अग्निवीर भरतीसाठी दोन वर्षांची अट शिथील करण्यात आली आहे. मागील दोन वर्षी सैन्य भरती न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 


भारतीय हवाई दल आणि नौदलातील भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. नौदलातल्या अग्निवीर भरती प्रक्रियेचे नोटिफिकेशन मंगळवारी, 21 जून रोजी निघणार असून वायुदलातील भरती प्रक्रिया 24 जूनला सुरू होणार आहे. भारतीय हवाई दलातील अग्निवीर भरतीच्या या तुकडीसाठी पहिल्या टप्प्यातील ऑनलाइन परीक्षा 24 जुलैपासून सुरू होणार आहे. तर, प्रशिक्षणासाठीची नोंदणी डिसेंबर महिन्यात सुरू आहे. ही प्रक्रिया 30 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.  


नौदलात कधी होणार भरती?


भारतीय नौदलातील अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेसाठी 21 जून रोजी नोटिफिकेशन जारी होण्याची शक्यता आहे. ओदिशा येथील आयएनएस चिल्कामध्ये प्रशिक्षणासाठी 21 नोव्हेंबरपासून दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. नौदलात  महिला आणि पुरुष दोन्ही अग्निवीरांची भरती केली जाणार आहे. नौदलात या आधीपासूनच विविध जहाजांवर 30 महिला अधिकारी दाखल आहेत.


या वर्षात 25000 अग्निवीरांची भरती 


या वर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लष्करात 25000 अग्निवीरांची पहिली तुकडी दाखल होणार असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.  त्यानंतर फेब्रुवारी 2023 पर्यंत दुसऱ्या तुकडीत या प्रशिक्षणार्थींची भरती पूर्ण करून ही संख्या 40000 करण्यात येणार आहे. आगामी 4 ते 5 वर्षात अग्निवीरांची संख्या 50 ते 60 हजार करण्यात येणार आहे. त्यानंतर 90 हजारांहून वाढवून एक लाख इतकी करण्यात येणार आहे.