जम्मू काश्मीर: जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय लष्कराची पाकिस्तानात घुसखोरी अटळ असल्याचा असा दावा त्यांचे संरक्षणमंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी केला आहे. यासंबंधी भारताकडून सातत्याने वक्तव्ये केली जात आहेत आणि पाकिस्तानच्या लष्कराने सरकारला संभाव्य भारतीय हल्ल्याची माहिती दिली आहे असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. मात्र, त्यांनी केलेल्या वक्तव्यामागील कोणतेही कारण दिलेले नाही. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये घडामोडींना वेग आल्याचं चित्र दिसून येत आहे. 

भारतीय लष्कर पाकिस्तानमध्ये घुसण्याची तयारी करत असताना आम्ही जादा मदत पाठवत आहोत. अशा परिस्थितीत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात, त्यामुळे हे निर्णय घेण्यात आले आहेत असे ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे. आसिफ यांच्या वक्तव्यावर भारताच्या संरक्षण मंत्रालयाने किंवा परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आमच्या अस्तित्त्वाला थेट धोका असेल तरच आम्ही अण्वस्त्राचा वापर करू असे म्हणत इशारावजा धमकी देखील ख्वाजा आसिफ यांनी दिली. भारता सुरू असलेल्या तणावाबद्दल आम्ही आखाती देश, चीन या मित्र देशांसह ब्रिटन, अमेरिका आणि अन्य राष्ट्रांशी चर्चा केली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.  काही आखाती देशांनी दोन्ही बाजूंशी चर्चा केली असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली आहे. सिंधू जलकरार स्थगित करण्याचा भारताचा निर्णय ही युद्धाची कृती असल्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेचा ख्वाजा आसिफ यांनी उल्लेख केला आहे. 

राजनाथ सिंह यांची पंतप्रधानांशी चर्चा

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल (सोमवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीची माहिती दिल्याचे बैठकीची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. ही चर्चा सुमारे 40 मिनिटे चालल्याची चर्चा आहे.

भारतीय हवाई दलाला दोन मिनिटांच्या आत सज्ज होण्याचे केंद्राचे आदेश

पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. अशातच पाकिस्तानी लष्कराने सीमेवर हालचाली वाढवल्यामुळे, भारतीय हवाई दलाला आदेश येताच दोन मिनिटांच्या आत कारवाईसाठी सज्ज होण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे. भारत व पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करी सज्जतेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती आहे. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अधिक संख्येने तोफा आणण्यात आल्या आहेत.

कारवाई करण्यास लष्कर सज्ज

कोणतीही कारवाई करण्यास लष्कर सज्ज आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली असल्याचे कळते. त्यांनी सोमवारी पंतप्रधानांची भेट घेऊन जवळपास 40 मिनीटे चर्चा केली. काश्मीरमधील स्थितीबाबत त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. या हल्ल्यामागील सूत्रधारांना शिक्षा करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पर्यायांचा या बैठकीमध्ये विचार करण्यात आल्याची चर्चा आहे. त्या बैठकीबाबत केंद्र सरकारने अद्याप अधिकृतरीत्या कोणतीही माहिती दिलेली नाही.

पुंछ आणि काश्मीरच्या भागात दहशतवादी घुसवण्याचा पाकचा कट? 

पुंछ आणि काश्मीरच्या इतरही काही भागांमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार अद्याप सुरूच असल्याचं दिसून येत आहे. पाकिस्तानने आपल्या सीमावर्ती गावांमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सांगितले आहे. गेल्या 4 दिवसांपासून पाककडून सतत शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन होत आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी घुसवण्यासाठी या सर्व हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत. यासंबंधीचे वृत्त लोकमत वृत्तसंस्थेने दिले आहे.