नवी दिल्ली : मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पातून रेल्वेला काय मिळणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. रेल्वे प्रवाशांसाठी 'वंदे भारत' ही नवीन एक्स्प्रेस सुरु करण्याची घोषणा अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केली. विशेष म्हणजे देशात आता एकही मानवरहित रेल्वे फाटक उरलं नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.


रेल्वे मंत्रालय सांभाळणाऱ्या पियुष गोयल यांच्याकडे अरुण जेटलींच्या अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त कारभार सुपूर्द करण्यात आला. त्यामुळे पियुष गोयल यांनी मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. गेल्या काही वर्षांपासून रेल्वे आणि सामान्य बजेट एकत्रच सादर केलं जातं.

रेल्वेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 64 हजार 587 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी 'वंदे भारत' ही नवी सेमी हायस्पीड ट्रेन सुरु करण्याची घोषणा गोयल यांनी केली. या ट्रेनने जागतिक दर्जाचा आरामदायी प्रवास प्रवाशांना करता येईल, अशी खात्री गोयल यांना वाटते.

2018-19 हे वर्ष देशातील रेल्वेसाठी अत्यंत सुरक्षित होतं. देशभरात आता एकही मानवरहित रेल्वे फाटक उरलेले नाही, असा दावा त्यांनी केला आहे. यंदाचे आर्थिक वर्ष रेल्वेच्या दृष्टीने सुरक्षित ठरले, असेही त्यांनी सांगितले.

सुदैवाची गोष्ट म्हणजे रेल्वे तिकीटांच्या दरात कोणतीही वाढ करण्याची घोषणा पियुष गोयल यांनी केली नाही. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेत मोदी सरकारने घोषणांचा पाऊस पाडला.