नवी दिल्ली : आसामहून अरुणाचल प्रदेशमध्ये जात असलेलं वायूसेनेचं एएन-32 विमान बेपत्ता झालं आहे. आसामच्या जोरहाट एअरबेसहून दुपारी 12.30 वाजता विमानाने टेक ऑफ केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजता विमानाचा ग्राऊंड एजेंसी सोबत शेवटचा संपर्क झाला होता.


वायूसेनेचं सुखोई 30 आणि सी 130 ही स्पेशल ऑपरेशन विमानं एएन 32 विमानाचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आली आहेत. बेपत्ता झालेल्या विमानात एकूण 13 जण प्रवास करत आहेत, ज्यामध्ये 8 क्रू मेंबर्स आणि 5 प्रवाशांचा समावेश आहे. वायूसेनेकडून विमानाचा शोध घेण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.





एएन 32 हे रशियन बनावटीचं मिलिट्री ट्रान्सपोर्ट विमान आहे. जुलै 2016 मध्ये चेन्नईहून पोर्टब्लेअरला जात असलेलं एक एएन 32 विमान असंच बेपत्ता झालं होतं. या विमानात चार अधिकाऱ्यांसह 29 जण प्रवास करत होते. वायूसेनेनं या विमानाचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र या विमानाचा शोध लागू शकला नाही. अखेर वायूसेनेनं ती शोध मोहीम बंद केली.