Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या दोन महिन्यांमधील सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाल्याची दिलायादायक बाब आहे. देशात सोमवारी दिवसभरात 8 हजार 813 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 63 दिवसांनंतर देशात सर्वात कमी कोरोनाबाधित आढळले आहेत. आधीच्या दिवसाच्या तुलनेत नवीन कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. देशात रविवारी दिवसभरात 14 हजार 917 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी आकडेवारी जारी केली आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही घटली आहे.
15 हजार 40 रुग्ण कोरोनामुक्त
देशात गेल्या 24 तासांत 15 हजारहून अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. देशात सध्या 1 लाख 11 हजार 252 एकूण कोरोनाबाधित असून त्यांच्या उपचार सुरु आहेत. भारतात सध्या 15,040 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. देशात एकूण 4 कोटी 36 लाख 38 हजार 844 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
मुंबईत सोमवारी 584 रुग्णांची नोंद
सोमवारी मुंबईत 584 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सोमवारी 407 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,08,290 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.8 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत शून्य रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,664 झाली आहे.
महाराष्ट्रात 1142 रुग्ण कोरोनामुक्त
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत 1189 कोरोनाच्य नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर 1142 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,13,209 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.01 टक्के इतकं झालं आहे.
BA 5 व्हेरियंटविरोधात भारतात तयार होणार लस
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट सध्या नोवाव्हॅक्ससोबत ओमायक्रॉन व्हेरियंटवर लस विकसित करण्यासाठी काम करत असून लवकरच भारतात ओमायक्रॉनवर खास लस तयार होणार असल्याची माहिती अदर पुनावाला यांनी दिली आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अदर पुनावाला यांनी ही माहिती दिली. या वर्षाच्या अखेरपर्यंत ही लस भारतीय बाजारात येणार असल्याची माहितीही त्यानी दिली. ही लस ओमायक्रॉनच्या BA 5 च्या व्हेरियंटवर अधिक उपयुक्त असणार आहे.