Coronavirus Cases Today in India : भारतात कोरोनाचा संसर्ग घटताना दिसत असला, तरी धोका मात्र कायम आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाल्याचं आढळून आलं आहे. देशात 19 हजार 673 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत 19 हजार 336 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजारांपार
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजारावर पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी ही संख्या दीड लाखांपर्यंत पोहोचली होती. सध्या देशात 1 लाख 43 हजार 676 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशात एकूण 5 लाख 26 हजार 357 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहेत. शनिवारी 19 हजार 336 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून 4 कोटी 33 लाख 49 हजार 778 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईत शनिवारी 286 रुग्णांची नोंद
शनिवारी मुंबईत 286 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शनिवारी 265 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,03,025 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 649 झाली आहे.
महाराष्ट्रात 2087 नवे रुग्ण, चार जणांचा मृत्यू
शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी राज्यात दोन हजार 87 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर शुक्रवारी राज्यात 1997 रुग्णांची भर पडली होती. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शनिवारी दोन हजार 259 जणांनी कोरोनावर मात केली होती. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या 78 लाख 84 हजार 495 इतकी झाली आहे.