Coronavirus Cases Today in India : देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना संसर्गामध्ये घट झाल्याचं आढळून आलं आहेत. देशात शनिवारी दिवसभरात अर्थात गेल्या 24 तासांत 14,092 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत ही रुग्ण संख्या कमी झाली आहे. आदल्या दिवशी शुक्रवारी देशात 15 हजार 815 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. याच्या तुलनेनं नव्या आकडेवारीनुसार, नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत 1,723 रुग्णांची घट झाली आहे, ही चांगली बाब आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने ही नवीन आकडेवारी जारी केली आहे.


आतापर्यंत 88 कोटींहून अधिक नमुने तपासणी


देशात गेल्या 24 तासांत 3 लाख 81 हजार 861 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत एकूण 88 कोटींहून अधिक नमुने तपासण्यात आले आहेत. देशात शनिवारी दिवसभरात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कोरोनाबाधितांपेक्षा जास्त आहे. गेल्या 24 तासांत 16 हजार 454 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात एकूण 4 कोटी 36 लाख 9 हजार 566 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 16 हजारांवर


देशातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील घटली आहे. आता देशात 1 लाख 16 हजार 861 कोरोना रुग्ण आहेत. तर शनिवारी दिवसभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 28 लाख 1 हजार 457 डोस देण्यात आले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा दैनंदिन सकारात्मता दर 3.69 टक्के, तर आठवड्याचा सकारात्मता दर 4.57 टक्के आहे. तसेच देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.54 टक्के आहे. 




शनिवारी महाराष्ट्रात 2040 नव्या रुग्णांची नोंद


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी महाराष्ट्रात दोन हजार 40 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. दिलासादायक म्हणजे, मागील 24 तासांत दोन हजार 48 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येनं टेन्शन वाढवलं आहे. शनिवारी मुंबईत 867 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 


मुंबईनं टेन्शन वाढवलं


मुंबईत शनिवारी 867 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शनिवारी 486 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,07,419 वर पोहोचली आहे.