Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोनाचा संसर्गात चढ-उतार पाहायला मिळात आहे. देशात सोमवारी कोरोनाबाधितांमध्ये मोठी घट दिसून आली होती, पण आज पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. देशात मंगळवारी दिवसभरात 9,062 नवीन कोरोना रुग्णांनी नोंद झाली आहे. सोमवारच्या तुलनेनं कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मात्र दिलासादायक बाब अशी की, देशात सलग दुसऱ्या दिवशी 10 हजारांहून कमी रुग्ण आढळले आहेत. दुसरी चांगली बाब म्हणजे नवीन कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत 15 हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे.


सक्रिय रुग्णांची संख्या एक लाखावर


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या भारतात एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 5 हजार 58 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मंगळवारी दिवसभरात देशात 15 हजार 220
 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आजपर्यंत एकूण 4 कोटी 36 लाख 54 हजार 64 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशात मंगळवारी दिवसभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 25 लाख 90 हजार 557 डोस देण्यात आले आहेत.




मुंबईत मंगळवारी 332 रुग्णांची नोंद, दोघांचा मृत्यू


मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी मुंबईत 332 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत मंगळवारी 477 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,08,767 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.8 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,666 झाली आहे. सध्या मुंबईत 5,071 रुग्ण आहेत. 


Corbevax लसीच्या जागृतीसाठी कँप आयोजित करण्याचे आदेश


कोरोनावरील कॉर्बेव्हॅक्स लसीच्या उपलब्धतेविषयी आणि वापराविषयी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, विमानतळ, महाविद्यालयं आणि शक्य त्या सर्व सार्वजिनक ठिकाणी कॅंपचे आयोजन करा असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सर्व राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांना हे निर्देश दिले आहेत. 


कोण घेऊ शकतं Corbevax लसीचा बूस्टर डोस?


देशातील 18 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती, ज्यांनी कोवॅक्सिन किंवा कोविशील्ड लसीचे दोन डोस घेतले आहेत. ते आता Corbevax लसीचा बूस्टर डोस घेऊ शकतात. केंद्र सरकारनं ई कॉर्बेवॅक्स बूस्टर डोसला मान्यता दिली आहे.