16th December In History : पाकिस्तानच्या आत्मघातकी निर्णयामुळे त्याने भारतावर हल्ला केला आणि 1971 च्या युद्धाला तोंड फुटले. त्यानंतर अवघ्या 14 दिवसात भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि बांग्लादेशची निर्मिती केली. 16 डिसेंबर रोजी पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली. दुसऱ्या एका अर्थाने आजचा दिवस हा भारतासाठी धक्कादायक ठरला. आजच्या दिवशी म्हणजे 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीतील एका युवतीवर सामूहिक अत्याचार (Nirbhaya Case) करण्यात आले, त्यामध्ये त्या युवतीचा मृत्यू झाला. यासह इतिहासात आजच्या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत त्यावर नजर टाकू. 


1920- चीनच्या कान्सू प्रांतात भूकंप, एक लाखाहून जास्त लोकांचा मृत्यू


चीनमध्ये 16 डिसेंबर 1920 रोजी कान्सू या भागात झालेल्या भूकंपात तब्बल एक लाखाहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. 


1945- जपानचे पंतप्रधान फुमिमारो यांची आत्महत्या


दुसऱ्या महायुद्धात जपानने जर्मनीसोबत राहून मित्र राष्ट्रांच्या विरोधात भूमिका घेतली. सुरवातीला जपानने मुसंडी मारत मोठ्या भागावर कब्जा मिळवला. नंतर जर्मनीने शरणागती पत्करली तरीही जपान लढत राहिला. पण अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉंबचा हल्ला केला आणि जपानने शरणागती पत्करली. या युद्धामध्ये जपानचे पंतप्रधान फुमिमारो यांना अमेरिकेने युद्ध अपराधी बनवले आणि खटला चालवायचा निर्णय घेतला. त्यावेळी या खटल्याला सामोरं न जाता फुमिमारो यांनी 16 डिसेंबर 1945 रोजी आत्महत्या केली. 


1951- हैदराबादच्या सालारजंग संग्रहालयाची स्थापना


हैदराबादचे प्रसिद्ध संग्रहालय, सालारजंग संग्रहायलाची 16 डिसेंबर 1951 रोजी स्थापना करण्यात आली. 


1971- पाकिस्तानची भारतासमोर शरणागती


पूर्व पाकिस्तानने म्हणजे आताच्या बांग्लादेशने पश्चिम पाकिस्तानविरोधात बंड केलं आणि स्वतंत्र्या देशाची मागणी केली. त्यानंतर पश्चिम पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानवर अत्याचार करत त्या देशात हिंसाचाराचा उच्छाद मांडला. यात पाकिस्तानने 3 डिसेंबर 1971 रोजी भारतावरही हल्ला केला. भारताने या युद्धात (India Pakistan war 1971) सहभागी होत केवळ 14 दिवसात पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि बांग्लादेशला स्वातंत्र्य केलं. तो दिवस होता 16 डिसेंबर 1971. हाच दिवस भारतात 'विजय दिवस' (Vijay Diwas) म्हणून साजरा केला जातो.


1985- देशातील पहिली फास्ट ब्रिडर अॅटोमिक रिअॅक्टर कल्पकम कार्यान्वित 


देशातील पहिले फास्ट ब्रिडर अॅटोमिक रिअॅक्टर असलेली कल्पकम अणुभट्टी 16 डिसेंबर 1985 पासून कार्यान्वित झाली. 


2009- 'अवतार' चित्रपट प्रदर्शित 


हॉलिवूडच नव्हे तर जगभरातील चित्रपटसृष्टीवर प्रभाव टाकणारा 'अवतार' हा चित्रपट 16 डिसेंबर 2009 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जगभरात कमाईचे सर्व विक्रम मोडत 2.7 अब्ज डॉलर्सची कमाई केली होती.


2012- देशाला हादरवणाऱ्या निर्भया अत्याचाराची घटना (Nirbhaya Case)


आजच्या दिवशी म्हणजे 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती.  ही घटना निर्भया केस (Delhi Rape Case) म्हणून ओळखली जाते. निर्भया सिनेमा पाहून झाल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय इतर सहा जण होते. त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्याला विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला. यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर सहा नराधमांनी धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर अनन्वित अत्याचार केले.


तरुणीला गंभीर जखमी केल्यानंतर नराधमांनी दोघांना दक्षिण दिल्लीच्या महिपालपूरजवळच्या वसंत विहार परिसरात धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र 29 डिसेंबर रोजी उपचारादरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला. या घटनेने देश हादरुन गेला.


2014- पाकिस्तानातील पेशावरमधील शाळेवर दहशतवाद्यांचा हल्ला, 150 जणांचा मृत्यू 


तहरिक ए तालिबान या दहशतवादी संघटनेने 16 डिसेंबर 2014 रोजी पाकिस्तानच्या पेशावरमधील एका शाळेवर हल्ला केला. त्यामध्ये 150 जणांना आपला जीव गमवावा लागला. या मृतांमध्ये 134 विद्यार्थी होते. सहा दहशतवादी या शाळेत घुसले आणि त्यांनी अंधाधूंद गोळीबार केला. या शाळेत 1500 हून अधिक विद्यार्थी होते.