India Pakistan War: भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये पाकने पुन्हा छुप्या पद्धतीने कुरापती सुरु केल्या आहेत. जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील जंगलात मंगळवारी सकाळी दहशतवादी दिसून आले होते. दहशतवादी दृष्टीस पडताच भारतीय लष्कराने या परिसराला वेढा घालून शोधमोहीम सुरु केली होती. यावेळी दहशतवादी आणि भारतीय सैन्य आमनेसामने आले आणि त्यांच्यात चकमक झाली. यानंतर भारतीय सैन्याच्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले आहेत. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेचे असल्याचे समजते. 

शोपियान जिल्ह्यातील  केलर येथील शुकरुच्या जंगलात हे दहशतवादी लपून बसले होते. या दहशतवाद्यांची खबर मिळताच भारतीय सैन्याने हा परिसर पूर्णपणे वेढला होता. भारतीय सैन्य जंगलात दहशतवाद्यांना शोधत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले आहेत. उर्वरित दहशतवाद्यांना सध्या शोध सुरु आहे. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेचे असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

यापूर्वी 22 एप्रिल रोजी पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी 26 भारतीय पर्यटकांना मारले होते. दहशतवाद्यांनी या पर्यटकांच्या डोक्यात गोळ्या घातल्या होत्या. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. पहलगाम दहशतवादी हल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सिंदूर' केले होते. यामध्ये पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. यामध्ये तब्बल 100 दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. मृतांमध्ये मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड, कंदहार विमान अपहरणात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांसह जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडर्सचा मृत्यू झाला होता.

Indian Air Force: भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये 11 पाकिस्तानी सैनिक ठार

पाकिस्तानी सैन्याने 7 ते 10 मे या कालावधीत भारतावर ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हा हल्ला परतावून लावत पाकिस्तानवर प्रतिहल्ला चढवला होता. भारताच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे अनेक महत्त्वाचे हवाई उद्ध्वस्त झाले होते. यावेळी 11 पाकिस्तानी सैनिकांचाही मृत्यू झाल्याची कबुली पाकच्या सैन्याने दिली आहे. भारताच्या हल्ल्यात ठार झालेल्या सैनिकांमध्ये स्क्वार्डन लीडरचाही समावेश आहे. अब्दुल रहमान, दिलावर खान, इकरामुल्ला, खालिद, मुहम्मद अदील अकबर, निसार आणि स्क्वार्डन लीडर उस्मान युसूफ, मुख्य तंत्रज्ञ औरंगजेब, नजीब, कॉर्पोरेल तंत्रज्ञ फारुख आणि वरिष्ठ तंत्रज्ञ मुबाशिर यांचा मृत्यू झाल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराकडून देण्यात आली आहे.

नरेंद्र मोदींची अचानक आदमपूर हवाई तळाला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी सकाळी पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट दिली.  आज सकाळी कोणतीही सूचना न देता पंतप्रधान मोदी याठिकाणी आले. यानंतर मोदींनी वायूदलाच्या जवानांशी संवाद साधताना त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

आणखी वाचा

पाकिस्तानी सैनिक जेएफ-17 विमान उडवणार तितक्याच भारताचं रॉकेट एअरबेसवर आदळलं, पाकच्या 11 सैनिकांचा खात्मा