India Pakistan War news: भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये घुसून धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर सध्या पाकिस्तान चवताळला आहे. एकीकडे भारताच्या भीतीने अमेरिकेला मध्यस्थी करायला लावून शस्त्रसंधी करणाऱ्या पाकिस्तनाच्या मनात सूडाग्नी अजूनही धगधगत आहेत. सध्या शस्त्रसंधीमुळे पाकिस्तानचे हात बांधले असले तरी इतिहास पाहता पाककडून पुन्हा कुरापती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी संचलनालयाचे महानिर्देशक (DGMO) स्तरावर चर्चा सुरु आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्या डीजीएमओ अधिकाऱ्यांची शनिवारी चर्चा झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करार झाला होता. त्यानंतर काल म्हणजे सोमवारी संध्याकाळी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ यांच्याच चर्चेची आणखी एक फेरी पार पडली होती. यावेळी पाकिस्तानी डीजीएमओंनी आम्ही शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार नाही, सीमारेषेवर एकही गोळी चालवणार नाही, असे आश्वासन दिले होते. भारताचे विद्यमान डीजीएमओ राजीव घई यांच्यावर सध्या अत्यंत नाजूक क्षणी पाकिस्तानची चर्चा आणि वाटाघाटी करण्याची जबाबदारी आहे.

Indian Army: डीजीएमओ नक्की काय करतात?

भारतीय लष्करात DGMO हे पद एका वरिष्ठ लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असते. हा अधिकारी थ्री स्टार रँकचा असतो. डीजीएमओंचे मुख्य काम लष्कराच्या संरक्षण धोरणाची अंमलबजावणी करणे हे असते. DGMO हे थेट भारतीय पायदळाच्या प्रमुखांना रिपोर्टिंग करतात. याशिवाय, भारतीय पायदळ, वायूदल आणि नौदलात यांच्याशी समन्वय ठेवून काम करण्याची जबाबदारी डीजीएमओंवर असते.

डीजीएमओंची मुख्य जबाबदारी युद्धाची रणनीती आखणे, दहशतवादीविरोधी मोहीमा राबवणे आणि नियंत्रण रेषेवरील तणाव सांभाळणे ही असते. ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाला तोंड फुटले होते. फक्त दोन दिवसांत हल्ले-प्रतिहल्ले यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद टोकाला पोहोचला होता. त्यामुळे आणखी मोठे युद्ध भडकण्याची शक्यता होती. अशावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्या डीजीएमओंनीच चर्चा करुन शस्त्रसंधीचा निर्णय घेतला होता.

India Pakistan War: डीजीएमओंना पगार किती असतो?

डीजीएमओ दर्जाच्या अधिकाऱ्याची जबाबदारी मोठी असल्यामुळे त्याचा पगारही जास्त असतो. सातव्या वेतन आयोगानुसार, लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्याचा बेसिक पगार 1,82,200 ते 2,24,100 इतका असतो. याशिवाय, मिलिट्री सर्व्हिस, डीए आणि अन्य भत्ते मिळून डीजीएमओंची दर्जाच्या अधिकाऱ्याचा एकूण पगार 2.5 लाख ते 3 लाख इतका असतो. याशिवाय, डीजीएमओंना सरकारी निवासस्थान, वैद्यकीय सुविधा आणि सरकारी वाहन यासारख्या सुविधाही दिल्या जातात. 

आणखी वाचा

पाकिस्तानने भारताचं राफेल विमान पाडलं का, सगळे पायलट सुखरुप आहेत का? एअर मार्शल ए.के. भारती काय म्हणाले?