India Pakistan War: भारतीय सैन्याने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये किमान 100 दहशतवादी आणि पाकिस्तानचे 30 ते 40 सैनिक मारले गेल्याची माहिती लष्करी संचलनालयाचे महानिर्देशक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीनंतर रविवारी तिन्ही सैन्यदलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानविरोधात राबवण्यात आलेल्या लष्करी मोहीमेची (Operation Sindoor) माहिती दिली. यावेळी भारतीय वायूदलाचे एअर मार्शल ए.के. भारती यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. काही परदेशी वृ्त्तसंस्थांकडून पाकिस्तानने भारताचे राफेल विमान (Rafale jets) पाडले, असा दावा केला जात आहे. यावर तुम्ही काय सांगाल, असा प्रश्न एअर मार्शल ए.के. भारती यांना विचारण्यात आला. यावर स्पष्टीकरण देताना एअर मार्शल ए.के. भारती यांनी भारतीय वायूदलाने (Indian Air force) त्यांचे उद्दिष्ट साध्य केल्याचे म्हटले. पण भारताचे राफेल विमान पडले की नाही, याविषयी त्यांनी थेटपणे बोलणे टाळले. (Indian army press conference News)
आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आपण युद्धजन्य परिस्थितीत आहोत. नुकसान हा लढाईचा भाग असतो. भारताचे राफेल विमान पडले की नाही, असा प्रश्न विचारण्याऐवजी तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की, किंबहुना आम्हीही स्वत:ला विचारला पाहिजे की, आपण आपलं लक्ष्य साध्य केलं का? दहशतवादी तळ लक्ष्य करण्याचं आपलं उद्दिष्ट साध्य केलं का? तर याचं उत्तर निर्विवादपणे हो असे आहे. आपण अजूनही युद्धजन्य परिस्थितीत आहोत. मी त्यावर (राफेल विमानाबाबत) आता काही बोललो तर ते शत्रूला फायदा होऊ शकतो. आम्हाला त्यांना कोणताही फायदा किंवा आघाडी मिळून द्यायची नाही. मी इतकंच सांगेन की, आम्ही ठरवलेलं उद्दिष्ट आम्ही साध्य केलं. आपले सगळे पायलट सुखरुप माघारी परतले आहेत, असे एअर मार्शल ए.के. भारती यांनी सांगितले.
यावेळी एअर मार्शल ए.के. भारती यांनी भारतीय सैन्यानेही पाकिस्तानची लढाऊ विमाने पाडल्याची माहिती दिली. भारताने पाकिस्तानची फायटर जेटस् पाडली पण ती भारताच्या हवाई हद्दीतच येऊ न दिल्यामुळे पुराव्यासाठी त्यांचे अवशेष उपलब्ध नसल्याचे एअर मार्शल ए.के. भारती यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा
ऑपरेशन सिंदूरचे 'ब्रह्मास्त्र', दहशतवादी तळांची राखरांगोळी अन् पाकिस्तानला स्पष्ट इशारा
कंदहार विमान अपहरण आणि 'पुलवामा'च्या मास्टरमाईंडचा खात्मा; भारतीय लष्कराने एक एक पुरावा दिला
