नवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत होता. या संतापानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra modi) देखील दहशतवाद्यांना, हल्लेखोरांना सोडणार नाही अशा शब्दात सरकारची भूमिका जाहीर केली. त्यानंतर, पाकिस्तानविरुद्ध व्यापार संबंध, जलसिंधू करार यासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तर, 7 मे रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केला. त्यामध्ये, 9 दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं होतं. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात एकप्रकारे युद्धजन्य परिस्थिती सुरू झाल्याचं दिसून आलं. सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन होऊन गोळीबार सुरूच होता, तर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्नही झाला. भारताने दोन्ही ठिकाणी चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र, पहलगाम हल्ल्यापासून संयमाने आणि रणनीतीने भारताने घेतलेल्या भूमिकेचं कौतुक होत आहे. तर, गेल्या तीन दिवसात भारतीन सैन्याने (Indian army) यह नया भारत है... हे दाखवून दिलंय.
7 मे मध्यरात्री 1.30 वाजल्यापासून ते आज 10 मे सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव व लष्करी कारवाई टोकाला पोहोचल्या होत्या. त्यामुळे, दोन्ही देशांत युद्ध होईल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही इतर देशांचे लक्ष भारताकडे लागले होते. मात्र, गेल्या 3 दिवसांत भारताने नव्या भारताचं नवं रुप दाखवलं आहे. रणनीती ते युद्धभूमीपर्यंत भारत सरकार आणि भारतीय सैन्य दलाने दाखवलेल्या सामर्थ्यशाली व युद्धनितीच्या 15 ठळक गोष्टी खालील प्रमाणे.
नव्या भारताचं नवं रुप दाखवणारे 15 मुद्दे
१) यह नया भारत है, भारताचं आक्रमक रुप दिसलं, भारताने पाकिस्तानात घुसून कारवाई केली. दहशतवादाविरूद्धची आपली भूमिका आजही ठाम असल्याचं आणि त्यासाठी कुठलीही तडजोड करणार नसल्याचं पाकिस्तानला दाखवून दिलं.
2) भारताने हवाई ताकद दाखवली -इंडियन एअरफोर्सचं शक्तीशाली रुप दिसलं, वायूदलाने आधी ढाल बनून हल्ले रोखले, त्यानंतर तलवार बनून चाल केली, टार्गेट ठेवून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केली. तर, पाकिस्तानने 400 पेक्षा जास्त ड्रोन हवेत सोडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ते ड्रोन भारतीय सैन्याने हवेत जिरवले.
3) सागरी सामर्थ्य - भारताने नेव्हीलाही सज्ज ठेवून, पाकिस्तानला समुद्री हल्ल्याच्या अनामिक भीतीत ठेवलं. आयएनएस विक्रांतसह भारताच्या युद्धनौका पूर्ण ताकदिनीशी समुद्रात उतरल्या होत्या. त्यामुळे, बलसागर भारत जगभरातील देशांना पाहायला मिळाला. लष्कर-आर्मी - भारतीय सैन्य दलाने तिन्ही स्तरावर आपलं सामर्थ्य दाखवून दिलं. भूदल, नौदल आणि वायूदलाने प्रत्येक कारवाईला चोख प्रत्युत्तर दिलंय. सीमारेषेवर भूदलाने गोळीबाराला जशास तसे उत्तर दिले. तर, एअर फोर्सने 'हवा'ई ताकद दाखवून पाकिस्तानला शांत केलं.
४) संयमी आणि करारीबाणा - छेडेंगे तो छोडेंगे नहीं असा पवित्रा भारताने घेतला होता. त्यानुसार, भारताने स्वत:हून पाकिस्तानच्या नागरिकांन इजा होईल असे कुठलेही कृत्य केलं नाही. पण, पाकिस्तानकडून होणाऱ्या कारवाईला जोरदार उत्तर दिलं.
५) भारताची मुत्सदेगिरी - या तीन दिवसांत भारताने आंतरराष्ट्रीय स्ट्रॅटिजी उत्तमपणे दाखवून दिली. जगभरात पाकविरोधी मत बनवण्यात भारताला यश आलं, सर्व देशांशी संपर्क ठेवणे, सर्वांना पटवून दिलं. तसेच, पहलगामवरील हल्ल्याला उत्तर देत दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.
६) एअरस्ट्राईकनंतर रात्रीच्या अंधारात पाकिस्तानने केलेले हल्ले भारतीय सैन्य दलाने परतवून लावले, जर हल्ला कराल तर जशास तसं प्रत्युत्तर मिळेल हे दाखवून दिले. त्यानुसार, हवेतच पाकिस्तानेच ड्रोन पाडले, विमानही पाडलं.
७) पाकिस्तानविरुद्धच्या लढाईत भारताने एकाही नागरी वस्तीवर हल्ला केला नाही, सर्वसामान्य नागरिक आणि निष्पाप जीवांना धोका पोहोचणार नाही याची काळजी घेत युद्धजन्य परिस्थितीतही भारताने माणुसकीचा नवा आदर्श घालून दिला.
८) पाकिस्तानचं एअर डिफेन्स सिस्टिम बंद पाडून भारताची तांत्रिक शक्ती भारतीय लष्कारने दाखवली. भारतीय एअर फोर्स कुणालाही टक्कर द्यायला आणि हवाई हल्ले परतवून लावायला सक्षम असल्याचा संदेशच या कारवाईतून गेला.
९) भारताची देशांतर्गत राजकीय परिपक्वता, सत्ताधारी आणि विरोधक एकत्र असल्याचं चित्र तीन दिवसांत पाहायला मिळालं. सर्वपक्षीय नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ देत भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढले. त्यामुळे, राजकीय परिपक्वतेचा नवा आदर्शही पाहायला मिळाला.
१०) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात राजकीय नेतृत्त्वाचा खमकेपणा पुन्हा एकदा दिसून आला. भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांशी आणि संरक्षणमंत्री व गृहमंत्र्यांसोबत पंतप्रधानांनी दररोज बैठका घेऊन भूमिका स्पष्ट केली. तसेच, लष्कराला महत्त्वाचे अधिकार देत राजकीय नेतृत्वाचा खमकेपणा दाखवून दिला.
११) भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर हे नाव देऊन सर्व भारतींना या मिशनसोबत भावनिकरित्या जोडलं. त्यामुळे, देशातील महिला वर्गही युद्धजन्य परिस्थितीत स्वत: पुढे येऊन आपले मत मांडू लागला. सिंदूर का बदला दहशतवाद्यांचं सिंदूर हेच भारताने दाखवून दिलं.
१२) भारतीय सैन्य दलातील कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग ऑपरेशन सिंदूरच्या चेहरा बनला. दहशवाद्यांनी महिलांना विचारुन हल्ला केला, भारताने महिला अधिकाऱ्यांना कारवाईच्या घडामोडी जगाला सांगण्यासाठी बसवलं. एक नवा चेहरा जगाला दिसला.
१३) दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, त्यामुळे भारतातील हिंदू मुस्लिम दरी वाढवण्याचा प्रयत्न केला, पण तो देशवासियांनी तो कट उधळून लावला. भारतातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचं नवं उदाहरण या हल्ल्यानंतर पाहायला मिळालं. भारतातील मस्जिद आणि मुस्लिमांकडून ठिकठिकाणी पाकिस्तानचा निषेध करण्यात आला.
१४) दहशतवादी कारवाया हेदेखील यापुढे युद्धच समजलं जाईल असं भारताने सांगितलं. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्णय घेण्यात आल्याने आता दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच धडा बसला आहे. दहशवाद्यांचा छुपा अजेंडा चालवल्यास पाकिस्तानला जगासमोर उघडं पडावं लागेल.
1५) भारतीय लष्कराचे सामर्थ्य या निमित्ताने दिसून आलं. सीमारेषेवर तैनात जवान, समुद्रातील युद्धनौका आणि ड्रोन हल्ले, मिसाईल्स आणि हवाई जेचं नवं युद्ध तंत्रज्ञान जगाने पाहिलं.