Viral Video : भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर अनेक परिवार एकमेकांपासून वेगळे झाले. काही जण पाकिस्तानात गेले तर काही भारतात राहिले. यात जवळच्या नात्यातली अनेक लोकं दुरावली. याच फाळणीत दुरावलेल्या दोन भावांची तब्बल 74 वर्षांनी भेट झाली आहे. 74 वर्षांनंतर हे दोघे भाऊ ज्यावेळी भेटले त्यावेळी दोघे एकमेकांना बिलगून रडू लागले. हे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
या दोन भावांची भेट झाली कर्तारपूर कॉरिडोरमध्ये. देशाला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं होतं त्यावेळी हबीब उर्फ शेला आणि सिद्दीक नावाचे हे दोन भाऊ अगदीच लहान होते. भारत पाकिस्तान फाळणी झाली त्यावेळी सिद्दीक आपल्या परिवारासह भारतातून पाकिस्तानात गेले तर त्यांचे मोठे बंधू हबीब हे भारतात राहिले. आता तब्बल 74 वर्षांनी हे दोन भाऊ पाकिस्तानमधील गुरुद्वारा दरबार साहिबला भारताशी जोडणाऱ्या कर्तारपूर कॉरिडोरमध्ये पुन्हा भेटले.
हबीब आणि सिद्दीक यांच्या भेटीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण भावूक झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. माहितीनुसार सिद्दीक पाकिस्तानच्या फैसलाबादमध्ये राहतात तर हबीब उर्फ शेला हे पंजाबमध्ये राहतात. या व्हिडीओत दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून रडताना दिसत आहेत.
हबीब हे सिद्दीक यांच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठे आहेत. फाळणीच्या वेळी सिद्दीक हे आपल्या आईसह फुलेवाला इथं गेले होते. तर बठिंडामध्ये एका दंगलीनंतर सिद्दीक आणि त्यांच्या परिवाराला पाकिस्तानमध्ये जावं लागलं.
आता 74 वर्षांनी दोघांना एकमेकांबद्दल कशीबशी माहिती मिळाली आणि त्यांची भेट झाली. या भेटीनंतर दोघांनी दोन्ही देशांच्या सरकारांचे आभार मानले आहेत. हबीब यांना भारतातून पाकिस्तानात पाच किलोमीटर दूर कर्तारपूर गुरुद्वारापर्यंत मोफत व्हिसा मुक्त सुविधा देण्यात आली.