नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनापूर्वी राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आला होता. पण सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यात आले आहेत. या प्रकरणी उत्तर प्रदेशच्या मथुरेतून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्या चौकशीत दिल्लीतील अक्षरधाम मंदिर आणि प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचं त्यानं कबूल केलं आहे.

मथुरेमध्ये पकडण्यात आलेल्या या संशयिताचे आणखी दोन साथिदार राजधानी दिल्लीत लपले असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेकडून या दोघांचा कसून शोध घेतला जात आहे.



अटक करण्यात आलेला संशयित भोपाळ शताब्दी एक्स्प्रेसने प्रवास करत होता. त्याला मथुरा स्टेशनवरुन अटक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी या संशयिताची आठ तास कसून चौकशी केली. या चौकशीत संशयिताने अनेक धक्कादायक खुलासे केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने आपले दोन साथिदार दिल्लीत लपल्याची कबूली दिली. तसेच हे तिघेही प्रजासत्ताक दिनापूर्वी एक मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचं त्याने सुरक्षा यंत्रणांना सांगितलं.

या चौकशीनंतर सुरक्षा यंत्रणांनी राजधानी दिल्लीची नाकेबंदी केली असून, दोघांचाही शोध सुरु आहे. यात स्पेशल सेल आणि आयबीच्या एका टीमने दिल्लीतील जामा मशिद परिसरातील काही गेस्ट हाऊस आणि हॉटेलवर छापेमारी केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल राशिद या हॉटेलमध्ये हे दोघेही संशयित थांबले असल्याची माहिती या छापेमारीवेळी तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी मिळाली. या दोघांपैकी एकाचं मुदासिर अहमद आणि दुसऱ्याचं मोहम्मद अशरम अशी नावं असल्याचं सांगण्यात येत आहे.

पण 6 जानेवारी रोजीच या दोघांनी हॉटेल सोडलं होतं. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, या दोघांचाही कसून तपास घेतला जात आहे.