नवी दिल्ली : भारतासह संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसमुळे आलेल्या महामारीचा सामना करत आहे. भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाच लाखांजवळ पोहोचली आहे. पण देशात अजूनही ट्यूबरक्यूलोसिस (Tuberculosis-TB)अर्थात क्षयरोग कोरोनापेक्षाही जास्त घातक असल्याचं चित्र आहे. भारतात मागील वर्षात सर्वाधिक 24.04 लाख क्षयरोगाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका वर्षात 79 हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी प्राण गमावले. जर कोरोना व्हायरसबाबत बोलायचं झाल्यास मागील जवळपास साडेतीन महिन्यात या महामारीमुळे देशात 15 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.


भारताच्या आरोग्य मंत्रालयाने बुधवारी (24 जून) भारताचा टीबी अहवाल 2020 जारी केला. यामधील आकडेवारीनुसार भारतात 2019 मध्ये 24.04 लाख टीबी रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने 26.9 लाख रुग्णांचा अंदाज वर्तवला होता. आता जारी केलेल्या अहवालानुसार प्रत्यक्ष रुग्णांची संख्या ही डब्लूएचओच्या अंदाजापेक्षा कमी असल्याचं समोर आलं.


तसंच या रोगामुळे 2019 मध्ये 79 हजार 144 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारीही जागतिक आरोग्य संघटनेच्या अनुमानापेक्षा कमी आहे. डब्लूएचओने 2019 मध्ये 4.4 लाख रुग्णांच्या मृत्यूचा अंदाज वर्तवला होता.


केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी वार्षिक अहवाल जारी करताना या कार्यात झालेल्या सामूहिक प्रयत्नांचं कौतुक केलं. ते म्हणाले की, "2025 पर्यंत देशाला टीबीमुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. टीबीच्या खात्म्यासाठी आपल्याला एकजूट व्हावं लागेल. तसंच या रोगामुळे होणारा भेदभावही रोखायला हवा." दरम्यान टीबी मुक्त होण्यासाठी जगाने 2030 चं लक्ष्य निश्चित केलं आहे.





या राज्यांचा आणि केंद्रशासित प्रदेशांची कामगिरी चांगली
याशिवाय 2019 मध्ये क्षयरोगावर नियंत्रण मिळवणाऱ्या 50 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये गुजरात पहिल्या, आंध्र प्रदेश दुसऱ्या आणि हिमाचल प्रदेश तिसऱ्या स्थानावर आहे. अहवालात म्हटलं आहे की, "50 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या त्रिपुरा आणि नागालँड ही राज्ये देखील अग्रस्थानी आहेत. दादरा-नगर हवेली आणि दमन-दीव या केंद्रशासित प्रदेशांची कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे.


यूपीसह पाच राज्यात निम्मे रग्ण
मागील वर्षाप्रमाणे यंदाही टीबीच्या एकूण रुग्णांपैकी निम्मे रुग्ण हे उत्तर प्रदेश (20 टक्के), महाराष्ट्र (9 टक्के), मध्य प्रदेश (8 टक्के), राजस्थान आणि बिहार (7-7 टक्के) या पाच राज्यांमध्ये आहेत.