नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख आता कमी होताना दिसत असून सोमवारी गेल्या पाच महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या आढळली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या नव्या 28,208 रुग्णांची भर पडली असून 373 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर गेल्या 24 तासात 41,511 लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. काल एकाच दिवशी 13,680 सक्रिय रुग्णसंख्या कमी झाली आहे. या आधी 15 मार्चला 24,492 रुग्णसंख्येची नोंद झाली होती.
देशातील कोरोनाची आकडेवारी
- कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 19 लाख 98 हजार 158
- एकूण कोरोनामुक्त : तीन कोटी 11 लाख 80 हजार 968
- एकूण सक्रिय रुग्ण : तीन लाख 88 हजार 508
- एकूण मृत्यू : चार लाख 28 हजार 682
- एकूण लसीकरण : 51 कोटी 45 लाख लसीचे डोस देण्यात आले
राज्यातली स्थिती
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. आज 4,505 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 568 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 51 हजार 956रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.76टक्के आहे.
राज्यात आज 68 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 44 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 68 हजार 375 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (8), धुळे (0) , हिंगोली (83), नांदेड (48), अमरावती (89), वाशिम (84), भंडारा (1), गोंदिया (86), गडचिरोली (21) या नऊ जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 149 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 208 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 208 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 372 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,15,389 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3,961 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1680 दिवसांवर गेला आहे.
काही ठिकाणी निर्बंध शिथील
राज्यात सिंधुदुर्ग रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, बीड, पुणे, सांगली अशा काही जिल्ह्यात अजून कोरोना संसर्ग वाढता आहे ते जिल्हे सोडून उर्वरित ठिकाणी काही निर्बंध शिथील केले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- PM Suraksha Bima Yojana : दर महिन्याला एक रुपया गुंतवा आणि दोन लाखांचा विमा घ्या, 'असं' करा रजिस्ट्रेशन
- मुलगी प्रौढ, कमवती असेल तर पालन-पोषणासाठी वडिलांच्या पैशावर हक्क सांगता येणार नाही, न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
- Petrol Diesel Price : देशात इंधनाच्या किमती ऐतिहासिक स्तरावर, आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?