India Coronavirus Updates: देशभरात सध्या कोरोना प्रादुर्भाव (Covid-19 Updates) सध्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 6,155 नवे रुग्ण आढळले आहेत. यासह, कोरोनाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 5.63 टक्क्यांवर पोहोचला आहे, तर साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 3.47 टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 31,194 वर पोहोचली आहे.  


दुसरीकडे, शुक्रवारी देशात कोरोनाचे 6,050 आणि गुरुवारी 5,335 रुग्णांची नोंद झाली होती. 6 महिन्यांनंतर देशात एकाच दिवसात इतके रुग्ण आढळले. कोरोनाची वाढती प्रकरणं पाहता सरकार अलर्ट मोडमध्ये आलं आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत मनसुख मांडविया यांनी कोरोनाच्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राज्यांसह कोरोना लसीकरणासंदर्भात आढावा घेतला. 






दिल्ली, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये वाढता प्रादुर्भाव 


राजधानी दिल्लीबद्दल बोलायचं झालं तर, शुक्रवारी येथे 24 तासांत कोरोनाच्या 733 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोना पॉझिटिव्ह दर 19.93 टक्के आहे. दुसरीकडे, शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 926 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यात कोरोनाचे 4487 सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे 276 नवे सक्रिय रुग्ण आढळले आहेत. मात्र मुंबईत आजपर्यंत कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही.


आश्‍चर्यकारक बाब म्हणजे, भारतात आढळलेल्या कोरोना प्रकरणांपैकी 38 टक्के रुग्ण XBB.1.16 या नव्या व्हेरियंटची आहेत. जिनोम सिक्वेन्सिंगवर लक्ष ठेवणाऱ्या INSACOG नं गुरुवारी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटलं आहे की, मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत घेतलेल्या नमुन्यांमध्ये ओमिक्रॉनचा XBB व्हेरियंट सर्वाधिक असल्याचं आढळून आलं आहे.


सतर्क राहण्याची आवश्यकता


केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी कोरोनाच्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राज्यांसह कोरोना लसीकरणासंदर्भात आढावा घेतला. केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांनी सांगितले की, आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार असून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. लोकांमध्ये अनावश्यकपणे भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता आरोग्य सुविधा, पायाभूत सुविधांचा आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांना दिले. त्याशिवाय राज्यांतील आरोग्य मंत्र्यांनी रुग्णालयांचा दौरा करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. देशभरात 10 आणि 11 एप्रिल रोजी संपूर्ण देशात मॉक ड्रिल करण्यात येणार आहे.