India Coronavirus Updates : भारतात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी, ओमायक्रॉननं हळूहळू डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 7,974 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 343 कोरोनाबाधितांनी जीव गमावला आहे. ज्यामध्ये केरळात काल (बुधवारी) कोरोनाचे 4006 आणि 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, देशात गेल्या 24 तासांत 7,948 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 47 लाख 18 हजार 602 रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 4 लाख 76 हजार 478 रुग्णांचा मृत्यू झाला होता. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 54 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या एक लाखांहून कमी झाली आहे. एकूण 87 हजार 245 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. 


देशात आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं धाकधुक वाढवली आहे. ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र आणि केरळात काल दिवसभरात प्रत्येकी 4-4 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तामिळनाडूमध्येही एक ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळून आला. दरम्यान, देशात सध्या ओमायक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या 73 वर पोहोचली आहे. 







देशातील कोरोनाची सद्यस्थिती :


कोरोनाबाधितांची एकूण संख्या : तीन कोटी 47 लाख 18 हजार 602
एकूण कोरोनामुक्त : 3 कोटी 41 लाख 54 हजार
एकूण सक्रिय रुग्णसंख्या : 87 हजार 245 
एकूण मृत्यू : 4 लाख 76 हजार 478
लसीकरणाची एकूण आकडेवारी : 135 कोटी 25 लाख 36 हजार लसीचे डोस 


राज्यात 925 कोरोनाबाधितांची नोंद तर 10 रुग्णांचा मृत्यू


कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात काल (बुधवारी) 925 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 929 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 94  हजार 617 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे. 


कोरोना प्रादुर्भावापासून तिसऱ्यांदा मुंबईत कोरोनामुळं 'शून्य' मृत्यू


मुंबईसाठी सर्वात मोठी पॉझिटिव्ह बातमी. कोरोना प्रादुर्भावापासून तिसऱ्यांदा मुंबईत कोरोनामुळं एकही मृत्यू झालेला नाही. कोरोनाची लाट आल्यापासून मुंबईत तिसऱ्यांदा कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावात पहिल्यांदाच मुंबईला एवढा मोठा दिलासा मिळत आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. लसीकरणाचा हा सकारात्मक परिणाम असल्याचं बोललं जातं आहे. तसेच, मुंबई महापालिका आणि प्रशासनानं परिस्थितीनुसार, वेळोवेळी राबवलेल्या उपाययोजनाही फायदेशीर ठरलं असल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, जगाची धाकधुक वाढवणाऱ्या ओमायक्रॉननं मुंबईतही शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सज्ज झाली असून निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. 


बुधवारी मुंबईत 238 रुग्णांची नोंद 


मुंबई महापालिकेनं जारी केलेल्या कोरोना आकडेवारीनुसार, मुंबईत काल दिवसभरात 238 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 210 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 745200 मुंबईकर कोरोनामुक्त झाले आहेत. अशातच बरे झालेल्या रुग्णांचा दर 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर सध्या शहरात सक्रिय 1797 रुग्ण आहेत. मुंबईसाठी आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे, मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 2514 दिवसांवर पोहोचला आहे. तर काल मुंबईत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह'