Coronavirus Cases in India Today 13 June: कोरोना रुग्णांची लाखोंच्या संख्येनं होणारी वाढ पाहता भारतातील आरोग्य यंत्रणांपुढं आव्हान उभं राहिलं होतं. यंत्रणा कोलमडते की काय अशीच भीती प्रशासनालाही होती. पण, अखेर कहर माजवणारी कोरोनाची दुसरी लाट आता देशातून काही अंशी ओसरतानाचं चित्र दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन यासंबंधीची माहिती समोर येत आहे. 


Bikaner : घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा पहिला मान बिकानेरला, सोमवारपासून लसीकरणाला सुरुवात


आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार मागील 24 तासांत देशात 80834 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, 1,32,062 रुग्णांनी या संसर्गावर मात केली. दिवसभरात  3,303  कोरोना रुग्णांचा मृत्यू ओढावला. रग्णंख्येचे हे आकडे पाहता मागील 24 तासांत नव्या रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांचं प्रमाण दुपटीहून जास्त आहे हेच स्पष्ट होत आहे.


एकूण आकडेवारी किती? 
एकूण कोरोनाबाधित - 2,94,39,989
एकूण कोरोनामुक्त - 2,80,43,446  
एकूण मृत्यू - 3,70,384
एकूण सक्रिय रुग्ण - 10,26,159  






देशातील सक्रिय रुग्णसंख्येतही काही अंशी घट झाली आहे. असं असलं तरीही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्यात तसुभरही हलगर्जीपणा साऱ्या देशाला पुन्हा धोक्याच्या दरीत लोटू शकतो. त्यामुळं शक्य त्या सर्वच मार्गांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लागू करण्यात आलेले निर्बंधही फार कमी प्रमाणातच शिथिल करण्याला यंत्रणांचं प्राधान्य दिसत आहे. 


महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती काय सांगते? 
राज्यात शनिवारी 10,697 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 14,910 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 360 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे, काल ही संख्या कमी नोंदवण्यात आली होती.