India China Disengagement : लडाखमधील गोगरा-हॉट स्प्रिंग पेट्रोलिंग पॉइंटवरून  चीन आणि भारत आपले सैन्य माघारी बोलवणार आहेत. 12 सप्टेंबरपर्यंत दोन्ही देशांकडून सैन्य माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. परराष्ट्र  मंत्रालयाने याबाबची माहिती दिली आहे. भारत चीन कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीच्या 16 व्या फेरीतील यशस्वी चर्चेनंतर भारत (India) आणि चीन (China) यांच्यातील गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लडाख ( Ladakh) सीमेवरील तणाव मिटला आहे.  दोन्ही देशांमधील चर्चेनंतर या वादावर तोडगा निघाला असून आता गोगरा-हॉट स्प्रिंग पेट्रोलिंग पॉइंट 15 (PP-15) परिसरातून भारतीय आणि चिनी सैन्याने माघार घेण्यात येणार आहे.  


लडाखमध्ये गेल्या दोन वर्षांपासून भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण होते. परंतु, दोन्ही देशांनी आता यावर समन्वयातून तोडगा काढला आहे.  परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांमधील संबंध चांगले राहावेत आणि सीमा क्षेत्रात शांती राहावी यावर भारत आणि चीनमध्ये सहमती झाली आहे.   
याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, लडाखमधील सीमा भागात दोन्ही बाजूंनी उभारण्यात आलेल्या सर्व तात्पुरत्या वास्तू आणि इतर संबंधित बांधकामे पाडण्यात येतील. याला दोन्ही देशांकडून परस्पर मान्यता दिली जाईल, असे मान्य करण्यात आले. दोन्ही बाजूंमध्‍ये वाद निर्माण होण्‍यापूर्वीच्‍या जमिनीचे तेच नैसर्गिक स्‍वरूप परिसरात पुन्हा निर्माण केले जाईल. 


2020 मध्ये LAC वर दोन्ही देशांमध्ये वाद झाला होता. चीनच्या सेन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता. परंतु, दोन्ही देशांच्या सैन्य माघारीच्या निर्णयानंतर आता येथील तणाव मिटणार आहे. दरम्यान, लडाख सीमेवरील वाद मिटला असताल तरी  डेपसांग प्लेन आणि डेमचोक सारख्या जुन्या फ्लॅश पॉइंट्सवर अजूनही तणाव कायम आहे. 


सैन्य मागे घेण्यावर सहमती
काल झालेल्या 16 व्या फेरीच्या बैठकीत दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्यावर सहमती झाली. या संदर्भात संरक्षण मंत्रालयाकडून कालच माहिती देण्यात आली होती. भारत चीन कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीच्या 16 व्या फेरीत झालेल्या सहमतीनुसार गोगरा-हॉटस्प्रिंग्स (PP-15) परिसरात भारतीय आणि चिनी सैन्याने माघार घेण्याचे ठरवले आहे. हा निर्णय म्हणजे सीमावर्ती भागात शांततेसाठी पोषक आहे, असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. 


महत्वाच्या बातम्या


India China Disengagement : भारत-चीनचा मोठा निर्णय! लडाखमधील गोगरा-हॉट स्प्रिंग पेट्रोलिंग पॉइंटवरून दोन्ही देशांच्या सैन्याची माघार