India-China Standoff : भारत (India) आणि चीनमध्ये (China) सुरु असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी चर्चेचे मार्ग खुले ठेवले आहेत. या अंतर्गत उद्या म्हणजे 14 ऑगस्ट रोजी भारत आणि चीनमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावर चर्चा होणार आहे. यादरम्यान लडाखच्या (Ladakh) पूर्व सीमेवरील कोंडी संपवण्याच्या दिशेने दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

दोन्ही देशांमधील कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची ही एकोणिसावी फेरी आहे. या बैठकींद्वारे दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्द्यांवर सहमती झाली आहे, तर काही मुद्दे अजूनही तणावाचे कारण बनले आहेत. चुशुल-मोल्डो भागात भारताच्या बाजूने चर्चेची एकोणिसावी फेरी होण्याची शक्यता आहे. उच्च-स्तरीय लष्करी चर्चेच्या एकोणिसाव्या फेरीत, भारत पूर्व लडाखमधील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या देपसांग आणि डेमचोक भागातून सैन्य काढून टाकण्याचा आग्रह धरु शकतो.

आतापर्यंत चर्चेच्या 18 फेऱ्या 

दरम्यान, एप्रिल महिन्यात पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेची अठरावी फेरी झाली. त्या बैठकीत भारताचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल रशीम बाली यांनी केले. त्याच दर्जाच्या एका चिनी अधिकाऱ्याने चीनची बाजू मांडली होती. चर्चेमुळे अनेक भागात सैन्याची तैनाती कमी झाली असून लष्करी बफर झोन तयार झाले आहेत. 2020 मध्ये गलवानमध्ये भारतीय सैनिक आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशांचे सैन्य सीमेवर आहेत. चीन सतत आपल्या बाजूने लष्करी पायाभूत सुविधांचा विकास करत आहे, तर भारताच्या बाजूनेही त्याला वेग आला आहे.

चीनवर भारत दबाव टाकणार

ANI ने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, 14 ऑगस्ट रोजी फायर अँड फ्युरी कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल रशीम बाली चिनी लष्कराच्या प्रतिनिधींसोबत चर्चेसाठी भारताचं नेतृत्व करतील. परराष्ट्र मंत्रालय आणि आयटीबीपीचे अधिकारीही चर्चेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही बाजूंनी DBO आणि CNN जंक्शनशी संबंधित मुद्द्यांवर तसेच इतर बाबींवर चर्चा करणे अपेक्षित आहे. भारत पूर्व लडाख आघाडीतून सैन्य मागे घेण्यासाठी दबाव टाकण्याची शक्यता आहे.

अनेक भागात तणाव कायम 

चीनने पँगॉन्ग तलावाजवळ विभाग-स्तरीय मुख्यालय बांधलं आहे. हे मुख्यालय गोगरा हॉट स्प्रिंग्सच्या दक्षिणेला आहे. चीनने गलवान खोऱ्यात आपल्या हद्दीत बॅरेकही बांधले आहेत. भारत आणि चीनमध्ये 3488 किलोमीटर लांबीची सीमा आहे. ही सीमा तीन विभागांमध्ये विभागली गेली आहे. ज्यामध्ये पूर्व क्षेत्र, पश्चिम क्षेत्र आणि मध्य क्षेत्र समाविष्ट आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या पाच भारतीय राज्यांच्या सीमा चीनला लागून आहेत. पश्चिम सेक्टरमध्ये जम्मू-काश्मीर, शिनजियांग आणि अक्साई चिनचा सीमावर्ती भाग वादग्रस्त आहे.