नवी दिल्ली : पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमन तब्बल 60 तासांनंतर काल (शुक्रवारी) मायदेशी परतले. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. आज नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये 'कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी इंडिया 2019'चे उद्धाटन करण्यात आले. यावेळी मोदी यांनी अभिनंदन यांचे कौतुक केले. मोदी म्हणाले की, ठभारताने डिक्शनरीमधील अभिनंदन या शब्दाचा अर्थ बदलला आहे. भारतात, इथल्या जवानांमध्ये शब्दांचा अर्थ बदलण्याची ताकद आहे."


मोदी म्हणाले की, "भारताच्या प्रत्येक हालचालीकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या देशात अशी ताकद आहे की, शब्दांचा अर्थ बदलला जातो. पूर्वी अभिनंदन या शब्दाचा इंग्रजी भाषेत 'Congratulation' असा अर्थ होता. परंतु आता या शब्दाचा अर्थ बदलला आहे."

भारतात घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी जेटला परतवून लावताना भारतीय पायलट अभिनंदन वर्थमनदेखील पाकिस्तानात पोहोचले होते. तिथे त्यांचे जेट क्रॅश झाले. पॅराशुटच्या सहाय्याने अभिनंदन पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरले. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले. तीन दिवस पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर काल (शुक्रवारी )अभिनंदन यांना मायदेशी धाडण्यात आले.